
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वन-डे सामना बुधवारी होणार आहे. भारताने या मालिकेवर २-०ने याआधीच कब्जा केलेला असल्याने यजमानांना क्लीनस्वीप देण्यास टीम इंडिया उत्सुक आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला आठवा कर्णधार मिळू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. भारताने मालिका जिंकलेली असल्यामुळे आता भारतीय संघात मोठे प्रयोग होऊ शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ अनेकविध पर्यायांची चाचपणी करण्याची शक्यता आहे.
राहुल द्रविड यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून भारताने सात कर्णधार पाहिलेले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या वन-डेमध्येही भारतीय संघाला आठवा कर्णधार मिळू शकतो, अशी चिन्ह दिसत आहेत.
भारताने कर्णधार आजमावण्याचे ठरविल्यास श्रेयस अय्यर हा भारताचा आठवा कर्णधार ठरू शकतो; पण रवींद्र जडेजा फिट झाला आणि तो संघात आला, तर त्याला हे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. जडेजा तिसऱ्या वन-डेसाठी पुनरागमन करण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रेयसला कर्णधारपदाची संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. भारतीय संघात कोणते बदल केले जातात, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.