टिम इंडिया यजमानांवरील वर्चस्व टिकवून ठेवण्यास उत्सुक; वेस्ट इंडिजचा मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न

भारताने पहिल्या सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवून यजमानांवर वर्चस्व मिळविले
टिम इंडिया यजमानांवरील वर्चस्व टिकवून ठेवण्यास उत्सुक; वेस्ट इंडिजचा मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोमवारी सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये होणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टिम इंडिया विजयी सातत्य राखून यजमानांवरील वर्चस्व टिकवून ठेवण्यास उत्सुक आहे. वेस्ट इंडिज मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.

भारताने पहिल्या सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवून यजमानांवर वर्चस्व मिळविले. वेस्ट इंडिजने या सामन्यात अतिशय निराशाजनक कामगिरी केली होती. त्यांना आपल्या खेळात खूपच सुधारणा करावी लागेल. त्यांनी गंभीरपणे विचार केला नाही, तर मालिका गमावण्यापासून त्यांना गत्यंतर राहणार नाही.

टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दरारा आणि दबाव दोन्ही निर्माण करता येईल. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यास यजमान संघ दबावाखाली येईल. त्याचा मालिकेवर भारताला अनुकूल परिणाम होईल. त्यामुळे वेस्ट इंडिज कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करील, अशीच दाट शक्यता आहे. कर्णधार निकोलस पूरन मुसंडी मारण्यात कोणतीही कुचराई करणार नाही. त्यामुळे सामना अटीतटीचा होण्याचीच चिन्हे आहेत.

पहिला सामना भारताने सहजगत्या जिंकलेला असला, तरी काही कमजोर बाबी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय संघ व्यवस्थापनाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी वेस्ट इंडिजला खास रणनीती आखूनच मैदानात उतरावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in