मुंबई : देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसे माझेही टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न आहे. सध्या मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मी फारसा त्याचा विचार करत नाही. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खडतर स्पर्धा असली तरी स्वप्नपूर्तीसाठी मी जीवापाड मेहनत घेणार आहे, असे रणजी करंडक विजेत्या मुंबई संघातील खेळाडू भूपेन ललवानी याने सांगितले.
यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत भूपेनने मुंबईकडून सर्वाधिक धावा काढल्या. ‘आस्क फाउंडेशन-२४’ च्या वतीने शुक्रवारी वांद्रे येथे एका कार्यक्रमात भूपेनचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि फाउंडेशनच्या संस्थापिका सदस्या अवनी अगस्ती हे उपस्थित होते.
“मी भारतीय संघात किंवा आयपीएलमध्ये खेळण्याचे लक्ष्य निर्धारित केलेले नाही. मुंबई इंडियन्स हा माझा सर्वात आवडता संघ आहे. लहानपणापासून मुंबईचा खेळ पाहूनच मी मोठा झालो आहे. मात्र आयपीएल हे मोठे व्यासपीठ असल्यामुळे कोणत्याही संघाकडून खेळण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करत आहे, तसे केल्यास नक्कीच मी माझे स्वप्न साकारू शकतो,” असेही त्याने सांगितले.
आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय वडिलांना देत भूपेन म्हणाला की, “माझ्या वडिलांची क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. पण काही कारणास्तव त्यांचे स्वप्न अधुरे राहिले; पण त्यांनी माझ्या रूपाने हे स्वप्न साकार केले आहे. घराचा एक भाग कमी करून त्यांनी तिथे नेट्स बांधले आणि मला तासनतास गोलंदाजी केली. यामुळे त्यांना गुडघेदुखीचा आणि खांदेदुखीचा त्रास सुरू झाला; पण, आज त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे.”
“मी सात वर्षांचा असताना वडिलांनी माझ्यातील क्रिकेटची गुणवत्ता हेरली. त्यांच्याकडूनच मला क्रिकेटचे प्राथमिक धडे मिळाले. दररोज वडील माझ्याकडून फलंदाजीचा सराव करून घ्यायचे आणि यामुळे त्यांच्या गुडघ्यासह खांद्याचे दुखणे वाढले. आज त्यांना चालण्यासही अडचणी येतात. पण, त्यांच्या या त्यागामुळेच मी यशस्वी ठरू शकलो. माझ्या प्रत्येक सामन्यात ते आवर्जून हजेरी लावतात. आम्ही रणजी करंडक जिंकल्यानंतरचा त्यांचा आनंद अवर्णनीय होता,” असेही भूपेन म्हणाला.