रजत आणि रिंकूमध्ये पदार्पणासाठी शर्यत मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज

पाटिदारने आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतानाही छाप पाडली आहे. मात्र तिलक वर्मा व राहुल यांनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली.
रजत आणि रिंकूमध्ये पदार्पणासाठी शर्यत मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज
PM

ग्वेबेर्हा (दक्षिण आफ्रिका) : मुंबईकर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत मंगळवारी रजत पाटिदार किंवा रिंकू सिंग यांच्यापैकी एकाला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील.

के. एल. राहुलच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जोहान्सबर्ग येथील पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा ८ गडी व २०० चेंडू राखून धुव्वा उडवला. अर्शदीप सिंग, आवेश खान या वेगवान जोडीचा भेदक मारा व पदार्पणवीर साई सुदर्शनने झळकावलेल्या शतकाच्या बळावर भारताने हा विजय साकारला. तसेच श्रेयसनेही अर्धशतकी योगदान दिले. मात्र श्रेयस २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारीला लागणार आहे. त्यामुळे तो कसोटी संघांतील खेळाडूंसह असेल. त्याच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचा पाटिदार खेळण्याची दाट शक्यता आहे.

पाटिदारने आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतानाही छाप पाडली आहे. मात्र तिलक वर्मा व राहुल यांनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली. तर मग पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकाचा विचार करता रिंकूला संधी दिली जाऊ शकते. डावखुऱ्या रिंकूने टी-२० प्रकारात स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे आता एकदिवसीय प्रकारातही संधी मिळाल्यास तो कमाल करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे एडीन मार्करमच्या आफ्रिकेवर २०२१नंतर मायदेशात चौथी एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की ओढवू शकते. पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा संघ ११६ धावांतच गारद झाला. त्यामुळे दुसऱ्या लढतीत ते कडवी झुंज देतील, असे अपेक्षित आहे. तसेच दुसरी लढत प्रकाशझोतात खेळवण्यात येणार असून खेळपट्टी संथ असल्याने फलंदाजांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागू शकतो.

अर्शदीप, आवेशचा धसका

अर्शदीप व आवेश यांच्या जोडीने स्विंग व वेगचा अप्रतिम नमुना पेश करताना पहिल्या सामन्यात आफ्रिकेचे ९ बळी मिळवले. त्यामुळे त्यांचा आफ्रिकन खेळाडूंनी धसका घेतला असेल. तसेच फिरकीपटू कुलदीप यादवही लयीत आहे. मुकेश कुमारला मात्र कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

मिलर, क्लासेनवर मदार

फलंदाजीत आफ्रिकेचा कर्णधार मार्करमसह अनुभवी डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासेन यांच्याकडून जबाबदारीपूर्ण खेळ अपेक्षित आहे. टी-२० मालिकेतसुद्धा हे खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नव्हते. गोलंदाजीत नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी व केशव महाराज यांच्यावर आफ्रिकेची भिस्त आहे.

 ८ ग्वेबेर्हा येथील स्टेडियमवर गेल्या १२ वर्षांत झालेल्या ८ एकदिवसीय सामन्यांत एकाही संघाने ३०० धावांचा टप्पा गाठलेला नाही. आफ्रिकेतील सर्वात संथ व आव्हानात्मक खेळपट्टी म्हणून ग्वेबेर्हाची ओळख आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : के. एल. राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटिदार, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, युझवेंद्र चहल, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनेल बार्टमन, नांद्रे बर्गर, टॉनी डी झॉर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली पोंगवाना, वियान मल्डर, अँडीले फेहलुकवायो, रासी व्हॅन डर दुसेन, तबरेझ शम्सी, कायले वॅरेन, लिझाड विल्यम्स.

logo
marathi.freepressjournal.in