किमान पुढील ८ वर्षांसाठी भारतीय संघ तयार : विराट कोहली

संघातील अनुभवी खेळाडू म्हणून माझे काम हे फक्त आयसीसी स्पर्धा जिंकणे नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचेही आहे. भारताकडे सध्या पुढील ८ वर्षांसाठी तरी विश्वावर वर्चस्व गाजवण्यासाठी पुरेसे कौशल्य आहे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

दुबई : संघातील अनुभवी खेळाडू म्हणून माझे काम हे फक्त आयसीसी स्पर्धा जिंकणे नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचेही आहे. भारताकडे सध्या पुढील ८ वर्षांसाठी तरी विश्वावर वर्चस्व गाजवण्यासाठी पुरेसे कौशल्य आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केली.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने ५ सामन्यांत १ शतकासह २१८ धावा केल्या. अंतिम फेरीत विराट अपयशी ठरला, तरी भारताने मात्र जेतेपद मिळवले. याकडेच विराटले लक्ष वेधले. “भारतीय संघ एखाद-दुसऱ्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून नाही. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्यावरही माझे लक्ष असते. माझ्या अपयशातही संघ जिंकणे महत्त्वाचे आहे. मी निवृत्त होण्यास नक्कीच अद्याप वेळ आहे. मात्र जेव्हा कधी निवृत्त होईन, तेव्हा माझी जागा घेण्यासाठी दुसरा खेळाडू सज्ज असला पाहिजे. सध्या आपल्याकडे पुढील ६ ते ८ वर्षे उत्तम संघ बांधण्यासाठी पुरेसे खेळाडू उपलब्ध आहेत,” असे विराट म्हणाला.

“ड्रेसिंग रूममध्ये सध्या असंख्य कौशल्यवान खेळाडू आहेत. दडपणाखाली कुणी ना कुणी हात वर करत संघाला विजयाची दिशा दाखवली. हेच एका चॅम्पियन्स संघाचे लक्षण असते. शुभमन, श्रेयस, राहुल यांनी फलंदाजीत कमाल केली. त्यानंतर वरुण, कुलदीप, शमी गोलंदाजीत छाप पाडत आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळेच भारताने हे यश मिळवले,” असेही विराटने आवर्जून नमूद केले.

विजेत्यांना सफेद ब्लेझर का?

-चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी विशेष पांढऱ्या रंगाचे ब्लेझर देण्यात येते. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे अनोखे वैशिष्ट्य आहे.

-एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम संघ म्हणून विजेत्या संघाने आपले नाव अधोरेखित केलेले असते. त्यांनी मिळवलेल्या यशाची विशेष ओळख सर्वांना स्मरणात रहावी म्हणून २००९पासून आयसीसीने ही प्रथा सुरू केली.

-आतापर्यंत ऑस्ट्रेलिया (२००९), भारत (२०१३), पाकिस्तान (२०१७) व भारत (२०२५) या संघांनी हे ब्लेझर परिधान केले आहे.

-या ब्लेझरवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सुवर्ण अक्षरांतील लोगो असतो. मुंबई स्थित फॅशन डिझायनर बबिता एम. यांनी इटालियन कापडापासून हे ब्लेझर बनवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in