
मुंबई : मुंबईचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान लाभले नाही. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरी व दुबईतील खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव असूनही श्रेयसकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्याने असंख्य चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय निवड समिती व प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेसाठी मंगळवारी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून त्याला थेट उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी ३० वर्षीय श्रेयसला संघात स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच मुंबईचा आणखी एक डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालचा राखीव खेळाडूंत समावेश करण्यात आला आहे. श्रेयस मात्र २० खेळाडूंतही नाही.
२०२५च्या आयपीएलमध्ये श्रेयसने पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. श्रेयसने १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयसने भारताकडून सर्वाधिक २४३ धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर, श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने गतवर्षी मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. श्रेयस हा फक्त एकदिवसीय संघाचा भाग आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डावलल्यावर किमान टी-२० संघात त्याचे पुनरागमन होईल, असे अपेक्षित होते. मात्र पुन्हा एकदा श्रेयसकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशिक्षक गंभीरशी त्याचे फारसे जमत नसल्याचीही चर्चा आहे. श्रेयस २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला आहे.
श्रेयसला संघात स्थान का नाही लाभले, याविषयी विचारले असता आगरकर यांनी पत्रकार परिषदेत टी-२० संघात भारतीय फलंदाजांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेकडे लक्ष वेधले. “श्रेयसकडे अफाट गुणवत्ता आहे, यात शंका नाही. मात्र सध्या टी-२० संघातील प्रत्येक स्थानासाठी जोरदार चुरस आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरीच्या आढावा घेतल्यास तुम्ही संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर करून श्रेयसला संधी देणार भारताच्या दृष्टीने ही बाब चांगली आहे की आपल्याकडे प्रत्येक जागेसाठी स्पर्धा आहे. मात्र दुर्दैवाने संघात १५ खेळाडूंनाच स्थान मिळू शकते. श्रेयसला त्याच्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल,” असे आगरकर म्हणाले होते. त्यामुळे एकूणच श्रेयसच्या प्रकरणामुळे वादंग सुरू झाले असून श्रेयसने याविषयी अद्याप काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पंजाब किंग्ज संघाने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसू असले, तरी त्यामागे वेदना लपल्याचे जाणवते.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.
श्रेयस, यशस्वीवर पूर्णपणे अन्याय?
निवड समितीचे काम सोपे नसते. एखाद्या खेळाडूला निवडल्यावर अन्य एखाद्याला का नाही निवडले, याचा तुम्हाला जाब विचारला जातो. मात्र यावेळी श्रेयस व यशस्वी पूर्णपणे दुर्दैवी ठरले आहेत, असे मला वाटते. यामध्ये पारदर्शकता हवी होती. श्रेयसला याविषयी कल्पना दिली असेल, अशी अपेक्षा आहे. कारण आयपीएलमधील चमकदार कामगिरी तसेच दुबईतील खेळपट्ट्यांवर त्याने दाखवलेली चमक, याकडे दुर्लक्ष करणे अनाकलनीय आहे. तसेच शुभमनला संघात घेतल्यामुळे मी आनंदी आहे. मात्र त्याच्यासाठी यशस्वीचा बळी देण्यात आला. यशस्वी हा २०२४च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. तर गिल त्यावेळी राखीव खेळाडूंत होता. तो व गिल एकाच वेळी अखेरचा टी-२० सामना खेळले. मग यशस्वीच संघाबाहेर का? - रविचंद्रन अश्विन, माजी फिरकीपटू
श्रेयस राखीव खेळाडूंत का नाही?
निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांनी श्रेयस गुणवान खेळाडू असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासाठी तुम्ही मुख्य संघातून कुणाला वगळाल, असे विचारले. मग श्रेयस किमान राखीव खेळाडूंत असायला हवा होता. श्रेयस २० खेळाडूंतही स्थान मिळवू शकला नाही, याचे आश्चर्य वाटते. कदाचित संघात कुणाला तरी तो फारसा आवडत नसावा. - अभिषेक नायर, माजी क्रिकेटपटू
श्रेयस विश्वचषकासाठी तरी संघात हवा!
आशिया चषकासाठी आपण निवडलेला संघ समतोल आहे. मात्र एका खेळाडूला संधी न मिळाल्याने मी आश्चर्यचकीत आहे तो म्हणजे श्रेयस. आयपीएलच्या कामगिरीच्या बळावर काही खेळाडू टी-२० संघात स्थान मिळवतात, तर श्रेयस का नाही. त्याने आयपीएलसह मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही छाप पाडली. इतकेच नव्हे तर, चॅम्पियन्स ट्रॉफीत तो आपला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आशिया चषकात त्याची नक्की उणीव भासेल. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी किमान श्रेयस भारतीय संघात परतेल, अशी आशा आहे. अन्यथा भारताचेच नुकसान होईल. - आकाश चोप्रा, समालोचक
श्रेयस, यशस्वीने अजून काय करायला हवे?
श्रेयस, यशस्वी हे अन्य कोणत्याही टी-२० संघात नक्कीच स्थान मिळवतील. मात्र त्यांना भारतीय संघात स्थान कसे नाही मिळाले, हे अनाकलनीय आहे. गेल्या वर्षभरात ते दोघेही आयपीएलसह देशांतर्गत टी-२० स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. विशेषत: श्रेयसकडे भारताचा कर्णधार होण्यासाठी आवश्यक असलेले गुणही आहेत. त्यामुळे त्याची राखीव खेळाडूंतही निवड न होणे धक्कादायक आहे. निवड समितीचे कार्य नेहमीच जोखमीचे असते. मात्र निवड समितीने कुणाच्याही दबावाखाली राहून खेळाडूंची निवड करू नये किंवा पात्र खेळाडूवर अन्याय करू नये. निवड समितीला लवकरच त्यांची चूक समजेल व श्रेयस, यशस्वीचे संघात पुनरागमन होईल, अशी आशा आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघाला शुभेच्छा. - हरभजन सिंग, माजी क्रिकेटपटू