भारताचा आजपासून तीन दिवसीय सराव सामना

श्रीलंकेविरुद्ध पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ शुक्रवारी स्थानिक श्रीलंका क्रिकेट एकादश (एसएलसी ११) संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.
भारताचा आजपासून तीन दिवसीय सराव सामना
भारताचा आजपासून तीन दिवसीय सराव सामना(Photo-X)
Published on

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ शुक्रवारी स्थानिक श्रीलंका क्रिकेट एकादश (एसएलसी ११) संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात भारतीय फलंदाजांची मुख्य परीक्षा फिरकी गोलंदाजीसमोर असणार आहे. तसेच भारताच्या क्षेत्ररक्षणासह स्लीप कॅचिंगवरही लक्ष असेल.

नुकत्याच मायदेशात पार पडलेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांना फिरकीपटूंविरुद्ध झगडावे लागले होते. त्यामुळे १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दृष्टीने हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघात अनुभवी रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. तसेच काही नव्या चेहऱ्यांनाही संधी लाभली आहे.

भारताने यापूर्वी २०१७ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. या पार्श्वभूमीवर सध्याच्या भारतीय संघात केवळ के. एल. राहुल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या तीनच खेळाडूंना श्रीलंकेत कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे बाहेर असल्याने भारताच्या गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज सांभाळणार आहे. त्याला प्रसिद्ध कृष्णा, गुर्नूर ब्रार, मानव सुतार आणि सारांश जैन यांची साथ लाभेल.

दरम्यान, कोलंबोमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सामन्यात व्यत्यय येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, सोनल दिनुशाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकादश संघात विश्व फर्नांडो, लाहिरू कुमारा, इसिथा विजेसुंदरा आणि रमेश मेंडिस यांसारख्या कसोटी दावेदार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

वेळ : सकाळी १० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in