
नवी दिल्ली : तीन दिग्गज खेळाडूंशिवाय युवा खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला हा दौरा जड जाईल असा अंदाज भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केला. मंगळवारी रात्री उशीरा चेन्नईविरुद्ध राजस्थानने विजय मिळवल्यानंतर राठोड बोलत होते.
फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती स्विकारली. त्यामुळे संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शुभमन गिल संघाचा नवा कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आघाडीच्या आणि मधल्या फळीत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
५ सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. या कसोटीपासून नव्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या चक्राला सुरुवात होणार आहे.
अश्विन, रोहित आणि कोहली हे दिग्गज खेळाडू आहेत. त्या तिघांचाही खेळ मला फार आवडायचा. परंतु निवृत्तीचा निर्णय हा त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. त्यांनी तो घेतलेला आहे. आपण त्याचा आदर करायला हवा, राठोड म्हणाले.
युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याची संधी
भारताला हा दौरा जड जाण्याची शक्यता आहे. काही वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्विकारली असल्याने भारतासाठी हा दौरा सोपा नसेल. युवा खेळाडू संघात आहेत. तसेच कर्णधारही नवा असेल. या सर्व गोष्टी संघावरील दबाव वाढवतील. परंतु युवा खेळाडूंना आपल्यातील गुणवत्ता आणि क्षमता दाखवण्याची ही संधी असेल, असे राठोड म्हणाले.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज खेळाडूंनी अलिकडेच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. या तिन्ही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड दौऱ्याकरिता अद्याप तरी भारताने आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूकडे दिले जाते याकडे क्रीडा जगताच्या नजरा आहेत. कोणत्या खेळाडूंना संघात संधी मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंची कसोटी लागणार आहे.