मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला लक्ष केंद्रित करावे लागणार

कर्णधार धवन दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे
मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला लक्ष केंद्रित करावे लागणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होत आहे. पहिल्या सामन्यात भारताला तीन धावांनी निसटता विजय मिळाल्याने दुसरा सामनाही अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. यजमानांवर कुरघोडी केल्याने टीम इंडियाचा; तर पाहुण्यांना जोरदार टक्कर दिल्याने यजमानांचा आत्मविश्वास जबरदस्त उंचावला आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे शिखर धवन संघाचे नेतृत्व करीत आहे. विजयामुळे त्याचेही मनोधैर्य वाढले आहे. तरीसुद्धा मालिका खिशात घालण्यासाठी मधली फळी सुधारण्यावर टीम इंडियाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

कर्णधार धवन दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यांच्या जागी अन्य खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येते. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने खेळविलेल्या तीन वेगवान गोलंदाजांपैकी युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला विकेट घेण्यात अपयश आले होते. गेल्या चार वन-डेत त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेल फ्लॉप ठरला. तो २१ चेंडूत २१ धावाच करू शकला. ४३ धावांच्या मोबदल्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. गेल्या काही सामन्यांपासून त्याची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे. युवा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांचा दुसऱ्या वन-डे सामन्यासाठी विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही उपलब्ध होऊ शकणार नसला, तरी कोरोनाग्रस्त जेसन होल्डर मालिकेतून बाहेर झाल्याने टीम इंडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. होल्डरने भारताविरुद्ध खेळलेल्या २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५० धावा केल्या आहेत आणि २३ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या वन-डेत वेस्ट इंडिजला त्याची उणीव भासली होती.

भारताविरुद्ध होल्डरने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा वन-डे खेळला होता. होल्डर सहा महिन्यांनी परतणार होता; पण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अजून काही काळ थांबावे लागणार आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर वेस्ट इंडिज संघापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in