नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक रवाना झाले असून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नांदेडची भाग्यश्री जाधव भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावणार आहे. भालाफेकपटू सुमित अंटीलही गोळाफेकपटू भाग्यश्रीच्या साथीने ध्वजवाहकाची धुरा वाहेल.
२८ ऑगस्टपासून पॅरिस पॅरालिम्पिक सुरू होणार असून यामध्ये भारताचे ८४ खेळाडू १२ क्रीडा प्रकारांत सहभागी होतील. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. यावेळी भारताचे २५ पदकांचे लक्ष्य आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. बॅडमिंटनपटू प्रमोद भगत मात्र या स्पर्धेला मुकणार असल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.