निष्फळ चर्चा थांबवा, सांघिक यश महत्त्वाचे; विराट आणि प्रशिक्षक गंभीरचे क्रिकेटप्रेमींना आवाहन

दोघांनीही गप्पा मारताना कसोटी क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले.
विराट कोहली आणि गौतम गंभीर
विराट कोहली आणि गौतम गंभीर(सौजन्य - ट्विटर)
Published on

चेन्नई : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संघर्षाची चर्चा असतानाच गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाला. त्यावेळी या दोघांमधील संबंधाचा संघावर कसा परिणाम होणार या चर्चेने जोर धरला. मात्र, दोघांनीही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अशा सगळ्या विनाकारण गप्पा थांबवा, सांघिक यश महत्त्वाचे हीच आमची भूमिका असल्याचे सांगितले.

कोहलीने ‘बीसीसीआय’च्या संकेतस्थळासाठी गंभीरची मुलाखत घेतली. या मुलाखतीत दोघांनीही वैयक्तिक संघर्षापासून स्वत:ला दूर ठेवत मनमोकळ्या गप्पा करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. गंभीर संपूर्ण कारकीर्दीत आक्रमकच खेळला, पण कोहली अजूनही तरुणपणात खेळायचा त्याच तीव्रतेने खेळत आहे. “आम्ही खूप पुढे आलो आहोत. दीर्घकाळ एकत्र खेळण्यापासून ते एकाच ड्रेसिंगरूमचा भाग असणे आणि कारकीर्दीमधील चढ-उतार आम्ही पाहिले,” असे कोहलीने सांगितले. “आमच्यात जे काही घडले ते चांगल्या खेळ भावनेतून घडले,” असे गंभीर म्हणाला.

दोघांनीही या गप्पांमध्ये कसोटी क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. “कसोटी क्रिकेट हे खेळाचे शिखर आहे. मी कसोटीपूर्वी एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले. पण, कसोटी क्रिकेटमधील पदार्पण ही माझ्यासाठी आजही सर्वोत्तम आठवण आहे,” असे गंभीर म्हणाला. “आज कसोटी क्रिकेटचे आव्हान कायम आहे. तुम्ही पुढील पिढीला कसे प्रेरित करता हे महत्त्वाचे आहे आणि यासाठी एक भक्कम कसोटी संघ तुमचे क्रिकेट भक्कम करतो,” असे गंभीरने सांगितले. मात्र, कोहली यावर पूर्ण समाधानी नव्हता.

कसोटी क्रिकेटमधील भारताची यशस्वी वाटचाल कायम राखण्यासाठी वेगवान आणि फिरकी गोलंदाजांची पुढची पिढी शोधण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाले. “दर्जेदार फलंदाज तयार होतीलच यात शंका नाही. आपल्या क्रिकेटची रचनाच तशी आहे. पण, भविष्यात गोलंदाजांचे महत्त्व वाढणार आहे. यासाठी दिवसभरात किमान २० षटके टाकणारे गोलंदाज मिळायला हवेत आणि ते शोधणे एक आव्हान असेल,” असे गंभीर म्हणाला.

मुलाखतीच्या शेवटी कोहलीने गंभीरला मैदानावरील वर्तनाविषयी छेडले असता, माझी जी देहबोली राहिली, तीच तुझी राहिली. त्यामुळे याचे उत्तर तू अधिक चांगले देऊ शकतील असे सांगून मुलाखतीला पूर्णविराम दिला. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी वर्चस्व गाजवले. आता कानपूर येथे २७ सप्टेंबरपासून उभय संघांतील दुसरी लढत सुरू होईल.

logo
marathi.freepressjournal.in