बव्हुमाचे पुनरागमन; तीन फिरकीपटूंना संधी! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर

जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेता कर्णधार टेम्बा बव्हुमाचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. भारताविरुद्ध १४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
बव्हुमाचे पुनरागमन | Photo : X
बव्हुमाचे पुनरागमन | Photo : X
Published on

जोहान्सबर्ग : जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेता कर्णधार टेम्बा बव्हुमाचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. भारताविरुद्ध १४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ मुख्य फिरकीपटूंचा समावेश असून युवा डेवाल्ड ब्रेविसलाही संधी देण्यात आली आहे.

३५ वर्षीय बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने जून महिन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारून जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची मानाची गदा मिळवली. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बव्हुमाला स्नायूंची दुखापत झाली. त्यामुळे तो २ महिने क्रिकेटपासून दूर होता. पाकिस्तानविरुद्ध नुकताच झालेल्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला नाही. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे. तसेच त्यापूर्वी तो भारत-अ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिका अ-संघाकडून खेळणार आहे. ऋषभ पंत भारत-अ संघाचे नेतृत्व करत असून ३० तारखेपासून ती मालिका सुरू होईल.

दरम्यान, आफ्रिकेच्या संघात केशव महाराज, सेनुरान मुथुस्वामी व सिमॉन हार्मर या फिरकीपटूंनी स्थान मिळवले आहे. कगिसो रबाडा, मार्को यान्सेन व कॉर्बिन बोश वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. डेव्हिड बेडिंघमने संघातील स्थान गमावले असून २२ वर्षीय ब्रेविसला प्राधान्य देण्यात आले आहे. भारत-आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे पहिली, तर २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे दुसरी कसोटी खेळविण्यात येईल. त्यानंतर दोन्ही संघांत ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामनेसुद्धा होणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बव्हुमा (कर्णधार), एडीन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, कायले वेरान, डेवाल्ड ब्रेविस, झुबेर हाम्झा, टॉनी डी झॉर्झी, कॉर्बिन बोश, वियान मल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, सेनुरान मुथुस्वामी, कगिसो रबाडा, सिमॉन हार्मर.

logo
marathi.freepressjournal.in