
लंडन : यावर्षी भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस तेंडुलकर-अँडरसन असे नाव देण्यात येणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या योगदानाबद्दल इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) हा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. मात्र त्यामुळे २००७पासून देण्यात येत असलेले पतौडी हे नाव बदलण्यात आले. २००७पासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ 'पतौडी' असे नाव देण्यात येत होते.
पतौडी यांनी वयाच्या २१व्या वर्षी भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र आता इंसीबीने तेंडुलकर अँडरसन असे नाव ट्रॉफीला दिले आहे. मात्र पतौडी यांचे नाव मालिकेशी निगडीत असावे असे तेंडुलकरने स्वतः ईसीबीला सुचवले. त्यामुळे आयसीसीशी संवाद साधल्यानंतर ईसीबीने आता या कसोटी मालिकेतील विजेत्या खेळाडूंना पतौडी पदक देऊन गौरवण्यात येईल, असे सांगितले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि पतौडी यांच्या पत्नी शर्मिला टागोर यांनी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत टीका केली होती. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीतील चौथ्या दिवशीच ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार होते. तसेच नाव बदलण्याचीही अधिकृत घोषणा होणार होती. मात्र अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे हे टाळण्यात आले. आता भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी तेंडुलकर व अँडरसन या दोघांनाही निमंत्रण देत ट्रॉफीचे अनावरण केले जाईल, तसेच मालिका संपल्यावर विजेत्या खेळाडूंना पतौडी पदकाचे वितरण केले जाईल, असे ईसीबीने स्पष्ट केले.