बहुप्रतीक्षित टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जवळ येऊन ठेपलेली असतानाच वेगवान गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. चेंडू तटविण्यासाठी पुढे येत पवित्रा घ्यावा आणि बॅटखाली टप्पा पडलेला चेंडू थेट स्टम्प्सवर आदळून त्रिफळा उडावा, तशीच अवस्था या यॉर्कर किंगच्या गमनाने टीम इंडियाची झाली आहे. टीम इंडियाच्या मागे दुखापतीचे शुक्लकाष्ठच लागले आहे जणू.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे काही दिवसांपूर्वी ऑलराउंडर रवींद्र जडेजाला माघार घ्यावी लागली होती. जडेजानंतर आता बुमराहलाही बाहेर जावे लागले आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आता ही टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधीच संपली आहे, अशा टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. तेव्हा खेळाडू जायबंदी झाले म्हणून का एवढे गलितगात्र व्हायचे? पर्यायी खेळाडूंवर भरोसा नाय का?
दोन स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने धक्का बसणे स्वाभाविकच आहे; पण आपल्याकडे पर्यायी खेळाडूही उपलब्ध आहेत. अनुभवी खेळाडूचा प्रतिस्पर्ध्यांना वाटणारा दरारा, धाक हा जरूर कमी झालेला असेल; पण गुणवत्तेची भारताच्या या वैभवशाली भूमीत टीचभरही कमतरता नसेल, असा आत्मविश्वास बाळगणे जरुरीचे आहे, खचितच.
टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या टीम इंडियात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल, विक्रमवीर विराट कोहली, धडाकेबाज सूर्यकुमार यादव, फिनिशर दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), अष्टपैलू हार्दिक पंड्या हे दिग्गज आहेत. दीपक हुडा, यष्टिरक्षक ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांची दमदार साथ त्यांना मिळणार आहे. शिवाय, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर हे स्टँडबाय म्हणजे राखीव खेळाडू आहेत. मग चिंता कसली? केवळ धोरणकर्त्यांनी धरसोडपणा सोडून नियोजन व्यवहार्य केले, म्हणजे झाले!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी बुमराह नेट्समध्ये सराव करत असताना त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यानंतर बुमराह पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले. बुमराहच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली; पण गुरुवारी बुमराह टी-२० विश्वचषक खेळणार नसल्याचेच स्पष्ट संकेत मिळाले. दोन दिग्गज बाहेर पडल्याने आता भारताला वर्ल्डकप कसा जिंकता येणार, असा प्रश्न काही जणांना निश्चितपणे सतावणार आहे; पण त्यांनी आशावादी राहणेही जरुरीचे आहे. म्हणतात ना, उम्मीद पे दुनिया कायम हैं!
बीसीसीआयकडून बुमराहबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या बुमराहला ठणठणीत बरे होण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा वेळ लागणार असल्याचे जाणकार सांगतात. बीसीसीआयचे काही अधिकारी खासगीत सांगतात की, “बुमराह टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही, हे पक्के आहे.” त्यामुळे बुमराह उपलब्ध असणार नाही, हे स्पष्टच आहे. तेव्हा तूर्तास ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं...’ असेच बुमराहच्या चाहत्यांना म्हणावे लागणार आहे.
बुमराहला पाठीची दुखापत होण्याची शक्यता वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. विशिष्ट शैलीमुळे बुमराहला पाठीच्या दुखण्याच्या मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने त्याने गोलंदाजी करताना काही गोष्टी सांभाळून करायल्या हव्यात, असे सांगत होल्डिंग यांनी सतर्क केले होते. होल्डिंगच्या बोलण्याकडे बुमराहसह साऱ्यांनीच दुर्लक्ष केले. असह्य भार न टाकता बुमराहचा माफक वापर करून घ्यायला हवा होता. टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक पंड्याबाबत बाळगलेला ‘विश्रांती’चा दृष्टिकोन बुमराहबाबतही ठेवायला हवा होता. होल्डिंग म्हणाले होते की, “बुमराहची गोलंदाजी शैली ही इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्याचे चेंडू फलंदाजांना ओळखता येत नसले, तरी अशी गोलंदाजी शैली ही बुमराहसाठी घातक ठरू शकते. कारण जेव्हा तो गोलंदाजी करतो, तेव्हा त्याच्या पाठीवर जास्त ताण येतो. हे कोणत्याही गोलंदाजासाठी योग्य नाही. त्याच्या या शैलीमुळे बुमराहला पाठीच्या दुखण्याच्या जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याने गोलंदाजी करताना काही गोष्टी सांभाळून करायल्या हव्यात.” मग जे या माजी गोलंदाजाला उमगले, ते फिजियोथेरपिस्टला का कळले नाही, असा प्रश्न सहजच मनात निर्माण होतो, साहजिकच.
बुमराहच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निदान आता झाले आहे. शरीराच्या एका भागावर जास्त ताण पडल्यास स्नायू किंवा हाडांना किंचित फ्रॅक्चर होऊ शकते, असे डॉक्टर सांगतात. असे असेल तर शरीराच्या एकाच भागावर जास्त ताण पडू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला फिजियोथेरपिस्टने बुमराहला वेळीच का दिला नाही? बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले असले, तरी सुदैवाने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. जेव्हा स्ट्रेस फॅक्चर होते, तेव्हा शक्यतो शस्त्रक्रिया टाळून फिजियोथेरपीवर जास्त भर दिला जातो. कारण स्ट्रेस फॅक्चर हे फिजियोथेरेपीने लवकर बरे होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे बुमराहच्या स्ट्रेस फॅक्चरवर शस्त्रक्रिया न करता त्याला अन्य मार्गाने फिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शस्त्रक्रिया टळल्याने बुमराहलाही मानसिक दिलासा मिळाला असेलच. दुखण्यातून लवकर उठण्यासाठी हे आवश्यकच आहे. ‘हमको जिसकी थी तलाश, वह तलाश हो तुम’ अशा आशयाच्या गौरवपर शब्दांनीही त्याला मनोधैर्य मिळू शकते, हमखास.
बुमराहऐवजी कुणाला संधी द्यायची, असा बाका प्रसंग मात्र बीसीसीआयपुढे उभा ठाकला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी चार राखीव खेळाडू आहेत. मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर या चौघांपैकी कोरोनातून बरा झालेल्या मोहम्मद शमीला बुमराहच्या संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. कारण तो बरा होण्याची प्रतीक्षा निवड समितीला होतीच ना!
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मासाठी टी-२० लढतींमध्ये कसोटीचा क्षण असणार आहे. त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. उपलब्ध खेळाडूंचा तो कसा वापर करून घेतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. टीम इंडियाला २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकता आलेली नाही, हा दबावसुद्धा त्याला झेलावा लागणार आहे.
तेव्हा ‘हार्ट बीट बढ़ रही हैं’ असे वाटले, तरी कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ‘ये कुछ नया नया हैं’ असे प्रतिस्पर्ध्यांना वाटण्याजोगी खास रणनीती आखावी लागणार आहे. प्रयोग करण्याचा खटाटोप मात्र त्यांनी कटाक्षाने टाळायला हवा. बुम-बुम बुमराह संघात नसला, तरी ‘झूम-झूम झूम बाबा...’ असे आत्मविश्वासपूर्वक म्हणत टीम इंडियाला ‘डान्स डान्स लेट्स डान्स’च्या पवित्र्यात ‘रन’मैदानात उतरावे लागणार आहे.
टी - २० वर्ल्डकप स्पर्धेला फारच थोडे दिवस उरले आहेत. तेव्हा ‘दिल में ख्वाब जागे हैं, निगाहें खोई खोई, डान्स डान्स’ याच भावनेने टीम इंडियाला कसून तयारी करावी लागेल. ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं...’ असे म्हणत ‘गेट वेल सुन’ अशा शुभेच्छा बुम-बुम बुमराहला देत असतानाच ‘झूम-झूम झूम बाबा‘सारखे सेलिब्रेशन करण्याची संधी तमाम भारतीयांना द्यायची, तर मग टी-२० विश्वचषकासाठी अंतिम ११ खेळाडूंची आतापासूनच पक्की निवड नक्की करून त्यांना अधिकाधिक सरावाची संधी देणेच या घडीला व्यवहार्य ठरेल, निश्चितच.