कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणार! आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शहा यांचे विधान

बीसीसीआयचे सचिव असलेले शहा न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांच्या जागी आयसीसी अध्यक्षपदाची जागा घेतील.
जय शहा
जय शहाएक्स
Published on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) अध्यक्ष म्हणून कसोटी क्रिकेटचा उद्घार व्हावा, या प्रकाराकडे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने वळावे, यालाच माझे प्राधान्य असेल, असे मत जय शहा यांनी व्यक्त केले. ३५ वर्षीय शहा यांची मंगळवारी आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १ डिसेंबरपासून ते हे पद सांभाळणार आहेत

बीसीसीआयचे सचिव असलेले शहा न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांच्या जागी आयसीसी अध्यक्षपदाची जागा घेतील. शहा यांचा बीसीसीआय सचिवपदाचा सध्या सलग दुसरा कार्यकाळ सुरू असून आणखी एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यांनी आयसीसी अध्यक्षपद स्वीकारल्याने आता हे बीसीसीआयचे सचिवपद रिक्त झाले आहे. आयसीसीच्या नव्या अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंतची मुदत होती. जय शहा यांच्याविरोधात कोणीही नसल्याने त्यांची या पदासाठी निवड झाली. ‘आयसीसी’ मंडळातील १६ पैकी १५ सदस्यांचा त्यांना पाठिंबा दर्शवला. जय शहा हे आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले असून पाचव्यांदा एखादा भारतीय व्यक्ती आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

“जगभरात टी-२० क्रिकेटचे वेड वाढत आहे. फ्रँचायझी लीगमुळे असंख्य युवा क्रिकेटपटूंचा शोध लागत असून यामुळे खेळाडूंची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. मात्र आयसीसीचे पहिले प्राधान्य नेहमी कसोटी क्रिकेटला असेल. कसोटी हा क्रिकेटचा मूळ गाभा आहे. त्यामुळे या प्रकाराकडे कधीही दुर्लक्ष केले जाणार नाही,” असे जय शहा म्हणाले.

“जगभरात क्रिकेटचा दर्जा टिकून रहावा, यासाठी मी प्रयत्नशील असेन. तसेच ही भूमिका स्वीकारताना मी क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय पातळीसह स्थानिक पातळीवरही कशाप्रकारे विकास होईल, याविषयी अभ्यास करेन. २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असल्याने त्यादृष्टीने पुढील काही वर्षांत विविध उपक्रम राबवण्यात येतील,” असेही शहा यांनी नमूद केले.

जय शहा युवा पिढीसाठी आदर्श : तेंडुलकर

“बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शहा यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. महिला व पुरुष खेळाडूंना समान मानधन देण्यासह त्यांनी स्थानिक स्पर्धांचे महत्त्वही वाढवले. त्यामुळे जय शहा हे युवा पिढीसाठी आदर्श आहेत. त्यांना आयसीसीच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा व अभिनंदन,” अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शहा यांचे कौतुक केले.

सचिवपदासाठी जोरदार शर्यत

आयसीसी अध्यक्षपदी जय शहा यांची निवड झाल्याने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) सचिव म्हणून त्यांची जागा कोण घेणार, याकडे सर्वांचे लत्र लागले आहे. यामध्ये सध्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे प्रमुख दावेदार असू शकतात. शुक्ला हे सध्या उपाध्यक्ष असल्याने वर्षभरासाठी सचिवपद सांभाळणे त्यांना सर्वांत सोपे जाईल असा अंदाज आहे. तसेच सहसचिव देवजित सैकिया हेसुद्धा शर्यतीत असू शकतील. युवा प्रशासकांमध्ये दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली, बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविषेक दालमिया, पंजाबचे दिलशेर खन्ना, गोव्याचे विपुल फडके आणि छत्तीसगडचे प्रभतेज भाटिया यांची नावेही चर्चेत येऊ शकतील.

logo
marathi.freepressjournal.in