के एल राहुलच्या नेतृत्वाची कसोटी

के एल राहुलच्या नेतृत्वाची कसोटी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या निमित्ताने के. राहुलवर खूप मोठी जबाबदारी टाकली गेली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सामी, शिखर धवन हे अनुभवी खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाहीत. यांच्याच गैरहजेरीत दुसऱ्या खेळाडूंना सोबत घेऊन के. राहुलला टीम इंडियाचं नेतृत्व करावे लागणार आहे. वैयक्ितकरीत्या पाहिले तर के. राहुल स्वत: टी-२०सारख्या खेळात गेल्या तीन-चार वर्षांपासून चांगलाच फॉर्मात आहे. आयपीएलमधली २०१८ ते २०२२ अशी पाच सत्र त्याने लागोपाठ गाजवली आहेत. त्याच्या फॉर्मबद्दल आणि गुणवत्तेबद्दल कुणालाच शंका नसणार; पण यावेळेस फलंदाजीबरोबरच पहिल्यांदाच एक कर्णधार म्हणून त्याच्या जबाबदारीतला अतिरिक्त भार वाढला असल्यामुळे अशा भूमिकेचे त्याच्यासमोर पहिल्यांदाच आव्हान उभे राहत आहे.

या मालिकेत त्याला नवीन चेहऱ्यांसोबत काही परिचित चेहऱ्यांची साथ मिळणार आहे. ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, ईशान किशन, कुलदीप यादव, अक्षर पटेल या परिचित चेहऱ्यांबरोबरच भारताच्या या १८ खेळाडूंच्या चमूमध्ये उमरान मलीक, रवि बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, दीपक हुड्डा, आवेश खान, अर्शदीप सिंग, वेंेकटेश अय्यर हे नवे चेहरेसुद्धा सामील झाले आहेत. के. राहुलला याच खेळाडूंचा आधार घेत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रत्येकाच्या फॉर्मनुसार संधी द्यावी लागणार आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, कोहली, रोहित शर्मा, बुमराह, सामी यांच्या गैरहजेरीत के. राहुलची ही मोठी परीक्षाच ठरणार आहे.

नव्या खेळाडूंची पलटण सोबत घेऊन त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टीमशी झुंजावं लागणार आहे. खुद्द के. राहुलने यावेळच्या आयपीएल स्पर्धेत खेळताना लखनौ सुपरजाईन्ट संघासाठी शानदार फॉर्म दाखवला. त्याने १५ सामन्यांमध्ये ५१.३३ च्या सरासरीने आणि दोन शतकांच्या मदतीने ६१६ धावा काढल्या. २०२१ लाही त्याने पंजाब संघाकडून खेळताना आयपीएलच्या १३ सामन्यांमध्ये ६२.६०च्या मजबूत सरासरीने ६२६ धावांचे योगदान दिले होते. २०२०च्या आयपीएल स्पर्धेत पंजाबकडूनच खेळताना के. राहुलने १४ सामन्यांमध्ये ५५.८३च्या सरासरीने ६७० धावा जमवल्या होत्या. के. राहुल आयपीएलमध्ये गेल्या पाच सत्रांपासून सातत्यपूर्ण असा फॉर्म कायम ठेवून आहे. एवढेच नाही तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतानाही टी-२०मध्ये शानदार फॉर्म दाखवला आहे. त्याने २०२०ला खेळलेल्या ११ आंतरराष्ट्रीय टी-२०च्या सामन्यांमध्ये ४४.८८च्या सरासरीने ४०४ धावा काढल्या. २०२१ला त्याने पुन्हा ११ सामन्यांमध्ये खेळताना २८.९०च्या सरासरीने २८९ धावा जमवल्या. २०२१च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत राहुलने भारतीय संघासाठी पाच सामन्यांमध्ये ३, १८, ६९, ५० आणि नाबाद ५४ अशा एकूण १९४ धावा ४८.५०च्या सरासरीने काढल्या होत्या. एकूणच टी-२० खेळातला के. राहुलचा ग्राफ गेल्या काही वर्षात चढताच राहिला आहे; मात्र आता त्याच्यावर नेतृत्वाची वेगळी जबाबदारी आल्यामुळे अशावेळी हे नेतृत्व त्याच्या फलंदाजीच्या आड येता कामा नये. हे दडपण निश्चितपणे के. राहुलवर असणारच. त्याने स्वत: विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही टी-२०मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना सर्वोत्तम साथ दिली आहे. आता अशाच सर्वोत्तम साथीची गरज के. राहुलच्या नेतृत्वाला लागणार आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव या खेळाडूंना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

के. राहुल आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अद्यापपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्याने टी-२०मध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या एकूण ५६ सामन्यांमध्ये ४०.६८च्या सरासरीने आणि दोन शतकांच्या मदतीने एकूण १,८३१ धावा जमवल्या आहेत. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध आठ सामन्यांत २०५, इंग्लंडविरुद्ध १० सामन्यांत २४२, न्यूझीलंडविरुद्ध आठ सामन्यांत ३२२, श्रीलंकाविरुद्ध आठ सामन्यांमध्ये २९५ आणि वेस्ट इंडीजविरुद्ध नऊ सामन्यांमध्ये ३५३ धावा काढल्या आहेत. भारताच्या घरच्या खेळपट्ट्यांवर के. राहुलने २६ टी-२०च्या सामन्यांमध्ये ३६.६९च्या सरासरीने ८४४ धावांची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिकासुद्धा भारतातच खेळली जाणार आहे. ९ जूनपासून या मालिकेला सुरुवात होतेय. भारताने टी-२०मध्ये यापूर्वी एकूण १५९ मुकाबले खेळले असून, त्यात भारताला १०१ विजय, ५१ पराभव स्वीकारावे लागले आहेत. २००६ पासून भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२०च्या सामन्यांमध्ये खेळतोय. दक्षिण आफ्रिका संघाने टी-२०मध्ये २००५पासून खेळताना एकूण १४७ सामन्यांमध्ये ८५ विजय आणि ६० पराभव स्वीकारले आहेत. ९ जूनपासून या दोन्ही संघात टी-२०च्या मालिकेतली पहिली झुंज दिल्लीला सुरू होणार आहे. के. राहुलसाठी त्याच्या कारकीर्दीतला हा नवा कोरा परीक्षेचा पेपर असणार. यात तो किती सफल होतो हे आता समजेलच. भारतीय संघातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पलटणची के. राहुलला कशी साथ मिळते, बघू या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in