ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंची आंतरशालेय स्पर्धेत चमकदार कामगिरी

ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सैयद मोदी कोचिंग योजनेतील खेळाडूंनी यंदा विविध शालेय आणि विभागीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.
ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंची आंतरशालेय स्पर्धेत चमकदार कामगिरी
Published on

ठाणे : बालपणापासूनच खेळाडू घडवून त्यांची पायाभरणी मजबूत करण्याचे ध्येय ठेऊन कार्यरत असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सैयद मोदी कोचिंग योजनेतील खेळाडूंनी यंदा विविध शालेय व विभागीय स्पर्धांमध्ये दणदणीत यश मिळवत आपल्या चमकदार कामगिरीची नोंद केली आहे.

ड्रीम स्पोर्ट्स एमएसएसए ८१वी आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत योहान नायरने मुलांच्या १० वर्षांखालील एकेरी गटात अजिंक्यपद पटकावले. उपांत्य फेरीत त्याने किआन जैनवर २१-६, २१-८ असा झंझावाती विजय मिळवला, तर अंतिम सामन्यात झीयान घिया याला १५-२१, २५-२३, १८-२१ अशा टप्प्याटप्प्याने पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

त्याच स्पर्धेत मयंक राजपूतने १४ वर्षांखालील गटात दमदार खेळी सादर करत विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत काव्या परमारवर २१-१४, २१-१७ असा विजय मिळवून तो थेट अंतिम फेरीत गेला, जिथे त्याने अर्जुन राऊतला २१-९, २१-११ असे हरवले.

दरम्यान, अभिलाषा शिरगावकरने ठाणे जिल्हा १४ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात सर्व सामने जिंकत सातारा इंटर-झोनल विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. यशवंत इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करताना अभिलाषाने आपल्या शाळेसाठीदेखील पहिल्यांदाच हा मान पटकावला आहे.

तसेच, पियूष सुतारने इंट्रा बॅडमिंटन स्पर्धेत १० वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात सुवर्णपदक जिंकत अकादमीच्या पदकांत भर घातली. या यशामध्ये खेळाडूंना दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी प्रशिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. अकादमीचे प्रशिक्षक अक्षय देवलकर, अमित गोडबोले, एकेंद्र दार्जी, प्रसेनजीत शिरोडकर, फुलचंद पासी व ऋषिकेश जोगळेकर यांच्या मेहनतीमुळे खेळाडूंनी अशा स्तरावर यश संपादन केले.

लहान वयापासूनच योग्य मार्गदर्शन व शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळाल्यास मुलांच्या पायाभरणीला बळ मिळते. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी ही पायरी महत्त्वाची ठरते, असे ठाणे बॅडमिंटन अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in