Pro Kabaddi : प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाचा पंगा आजपासून

साबरमती नदीत क्रूझवर शानदार उद्घाटन; १२ संघांत चषकासाठी चढाओढ
Pro Kabaddi : प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाचा पंगा आजपासून

अहमदाबाद : कबड्डी आणि भारतीय नागरिकांमध्ये अनेक वर्षांपासूनचे घट्ट नाते आहे. या प्रवासात २०१४मध्ये प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली आणि हे नाते आणखी दृढ झाले. मशाल स्पोर्ट्सच्या संस्थापकांनी या लीगच्या माध्यमातून ३० सेकंदांची चढाई, करा किंवा मरा (डू ऑर डाय), अव्वल चढाई (सुपर रेड), अव्वल पकड (सुपर टॅकल) असे नाविन्यपूर्ण नियम आणून कबड्डी खेळाला अधिक आकर्षक केले. त्याला थेट प्रसारणाच्या माध्यमातून लाखो चाहतेही मिळाले. आता ही लीग १०वे पर्व पूर्ण करत आहे.

प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाला शनिवारपासून अहमदाबाद येथील इका एरिना येथे प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी विख्यात साबरमती नदीतील अक्षर रिव्हर क्रूझवर १२ संघांचे कर्णधार आणि मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख तसेच प्रो कबड्डीचे प्रवर्तक अनुपम गोस्वामी यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन तसेच चषक अनावरण सोहळा पार पडला. यावेळा झालेल्या पत्रकार परिषदेसाठी गतवेळचा विजेता जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार सुनील कुमार व यंदाच्या हंगामात होणाऱ्या पहिल्या लढतीती दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित होते. गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील लढतीद्वारे हंगामाला प्रारंभ होणार असून शुक्रवारीच दुसऱ्या सामन्यात यू मुंबा आणि यूपी योद्धाज आमनेसामने येतील.

“१०व्या पर्वापासून लीग पुन्हा एकदा सर्व १२ शहरांत जाईल. आम्ही किमान नऊ भौगोलिक क्षेत्रात पुन्हा या निमित्ताने सक्रिय होणार आहोत. त्यामुळे २०१९ पासून ज्या शहरांना प्रो-कबड्डी लीगचा अनुभव घेता आला नाही, त्या शहरात सर्वप्रथम पोचणार आहोत. आता १२ शहरांमध्ये लीगचे आयोजन होत असल्यामुळे प्रत्येक घरच्या चाहत्यांना लीगशी जोडता येणार आहे,” असे गोस्वामी म्हणाले. गुजरात, तेलुगू, यू मुंबा, यूपी यांच्याव्यतिरिक्त पाटणा पायरेट्स, तमिळ थलायव्हाज, पुणेरी पलटण, जयपूर, दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स आणि हरयाणा स्टीलर्स या १२ संघांत चषकासाठी चढाओढ पाहायला मिळेल.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे!

  • २१ फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱ्या साखळी फेरीत प्रत्येक संघ २२ लढती खेळणार आहे.

  • स्पर्धेच्या बाद फेरीचे वेळापत्रक व ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल.

  • यापूर्वीच्या ९ हंगामांत पाटणाने सर्वाधिक ३, जयपूरने २, यू मुंबा, बंगळुरू, बंगाल आणि दिल्ली यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे.

आज होणारे सामने

  • गुजरात जायंट्स वि. तेलुगू टायटन्स

वेळ : रात्री ८ वा.

  • यू मुंबा वि. यूपी योद्धाज

वेळ : रात्री ९ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉट स्टार अॅप

असे असतील प्रत्येक शहरातील टप्पे

  • अहमदाबाद : २ ते ७ डिसेंबर

  • बंगळुरू : ८ ते १३ डिसेंबर

  • पुणे : १५ ते २० डिसेंबर

  • चेन्नई : २२ ते २७ डिसेंबर

  • नोएडा : २९ डिसेंबर ते ३ जानेवारी

  • मुंबई : ५ ते १० जानेवारी

  • पाटणा : २६ ते ३१ जानेवारी

  • दिल्ली : २ ते ७ फेब्रुवारी

  • कोलकाता : ९ ते १४ फेब्रुवारी

  • पंचकुला : १६ ते २१ फेब्रुवारी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in