नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या १७ दिवसांचे म्हणजेच एकंदर २१ सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लढतीद्वारे यंदाच्या हंगामाला प्रारंभ होणार असल्याने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या दोन मातब्बर खेळाडूंमधील जुगलबंदी चाहत्यांना सलामीलाच पाहायला मिळणार आहे.
२३ फेब्रुवारीपासून महिलांच्या आयपीएलचा (वुमेन्स प्रीमियर लीग) म्हणजेच डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम सुरू होईल. ही स्पर्धा १७ मार्चपर्यंत संपेल. त्यानंतर पाच दिवसांतच पुरुषांची आयपीएल सुरू होईल. मात्र एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत देशभरात लोकसभा निवडणूक रंगणार आहेत. त्यामुळे सध्या फक्त ७ एप्रिलपर्यंतच्या लढतींचेच वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यावर पुढील वेळापत्रक जाहीर करू, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले.
देशांतील १० शहरांत २१ सामने खेळवण्यात येणार असून यादरम्यान एक संघ किमान ३, तर कमाल ५ सामने खेळणार आहे. यापूर्वी २००९ व २०१४मध्ये निवडणुकांमुळे अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयपीएल खेळवण्यात आली होती. २०१९मध्ये मात्र निवडणुका असूनही संपूर्ण आयपीएल भारतात झाली होती. त्यामुळे यंदाही संपूर्ण आयपीएल भारतातच होईल, हे स्पष्ट आहे.
नेहमीप्रमाणे स्पर्धेतील दुपारचे सामने ३.३०, तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील. पहिल्या शनिवारी (२३ मार्च) तसेच दर रविवारी (२४, ३१ मार्च व ७ एप्रिल) प्रत्येकी दोन सामने खेळवण्यात येतील. वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना १ एप्रिल रोजी मुंबई-राजस्थान यांच्यात होईल.
शमी संपूर्ण आयपीएलला मुकणार
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी डाव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी यासंबंधी अधिकृत घोषणा केली. ३३ वर्षीय शमी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळल्यानंतर क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकादरम्यानच त्याला दुखापत झाली होती, असे समजते. सध्या शमी लंडन येथे असून लवकरच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात शस्त्रक्रिया झाल्यावर शमीला सरावाला पुन्हा प्रारंभ करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल. अशा स्थितीत तो थेट जूनमध्येच पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे २०२४ वेळापत्रक
दिनांक वार सामना वेळ
२२ मार्च शुक्रवार चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायं. ७.३० वा.
२३ मार्च शनिवार पंजाब किंग्ज वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३.३० वा.
२३ मार्च शनिवार कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद सायं. ७.३० वा.
२४ मार्च रविवार राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स दुपारी ३.३० वा.
२४ मार्च रविवार मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स सायं. ७.३० वा.
२५ मार्च सोमवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्ज सायं ७.३० वा.
२६ मार्च मंगळवार चेन्नई सुपर किंग्ज वि. गुजरात टायटन्स सायं. ७.३० वा.
२७ मार्च बुधवार मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद सायं. ७.३० वा.
२८ मार्च गुरुवार राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स सायं. ७.३० वा.
२९ मार्च शुक्रवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स सायं. ७.३० वा.
३० मार्च शनिवार लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्ज सायं. ७.३० वा.
३१ मार्च रविवार गुजरात टायटन्स वि. सनरायजर्स हैदराबाद दुपारी ३.३० वा.
३१ मार्च रविवार दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज सायं. ७.३० वा.
१ एप्रिल* सोमवार मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स सायं. ७.३० वा.
२ एप्रिल मंगळवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स सायं. ७.३० वा.
३ एप्रिल बुधवार दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सायं. ७.३० वा.
४ एप्रिल गुरुवार गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्ज साय. ७.३० वा.
५ एप्रिल शुक्रवार सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज सायं. ७.३० वा.
६ एप्रिल शनिवार राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायं. ७.३० वा.
७ एप्रिल* रविवार मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३.३० वा.
७ एप्रिल रविवार लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स सायं. ७.३० वा.
(वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने (*) या खुणेने दर्शवण्यात आले आहेत.)