जगज्जेत्या गुकेशचे मायदेशात आगमन

बुद्धिबळ विश्वातील सर्वात युवा जगज्जेता ठरलेल्या डी. गुकेशचे सोमवारी जल्लोषात भारतात आगमन झाले. चेन्नई विमानतळावर १८ वर्षीय विश्वविजेत्या गुकेशच्या स्वागतासाठी चाहत्यांनी अफाट गर्दी केली होती.
जगज्जेत्या गुकेशचे मायदेशात आगमन
Published on

चेन्नई : बुद्धिबळ विश्वातील सर्वात युवा जगज्जेता ठरलेल्या डी. गुकेशचे सोमवारी जल्लोषात भारतात आगमन झाले. चेन्नई विमानतळावर १८ वर्षीय विश्वविजेत्या गुकेशच्या स्वागतासाठी चाहत्यांनी अफाट गर्दी केली होती. तमिळनाडू शासनाचे मंत्री तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी यासाठी उपस्थित होते. यावेळी गुकेशच्या गळ्यात मोठा हार घालण्यासह पारंपरिक पद्धतेने स्वागत करण्यात आले. त्याला विशेष टोपीही देण्यात आली. यावेळी गुकेशचे आई-वडीलही हजर होते.

गुकेशने गेल्या आठवड्यात जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत चीनच्या डिंग लिरेनला १४व्या फेरीत धूळ चारली. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर भारताकडून जगज्जेतेपद मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. तसेच विश्वविजेता ठरणारा तो स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडूही ठरला. गुकेशने गॅरी कास्पारोव्ह आणि मॅग्नस कार्लसन यांचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी २२व्या वर्षी जागतिक जेतेपद मिळवले होते. मात्र गुकेशने १८व्या वर्षीच हा पराक्रम केला.

“तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. जागतिक जेतेपद मिळवणे खास आहे. यापुढेही तुमच्या पाठिंब्यामुळे देशासाठी उज्ज्वल कामगिरी करत राहीन,” असे गुकेश यावेळी म्हणाला. मंगळवारी गुकेशची वालाहज रोड येथील कलाईवनार अरंगम येथे जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनसुद्धा उपस्थित असतील.

गुकेश-कार्लसन आमनेसामने

पुढील वर्षी रंगणाऱ्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विद्यमान जगज्जेता गुकेश व माजी जगज्जेता मॅग्सन कार्लसन आमनेसामने येणार आहेत. गुकेशने काही दिवसांपूर्वीच कार्लसनसारख्या खेळाडूवर वर्चस्व गाजवल्यावर आपली महान खेळाडूत गणना करा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे २६ मे ते ६ जून दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागून असेल. ऑक्टोबर २०२२मध्ये गुकेशने एका स्पर्धेत कार्लसनला पराभूत केले होते.

logo
marathi.freepressjournal.in