मुंबईत रंगणार प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाचा लिलाव!

मुंबईत रंगणार प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाचा लिलाव!

८-९ सप्टेंबर रोजी खेळाडूंवर लागणार बोली; संघमालकांची मर्यादा ५ कोटींपर्यंत वाढली

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या १०व्या हंगामाचे चाहत्यांना वेध लागले असून सोमावारी मशाल स्पोर्ट्सकडून आगामी पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावप्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली. मुंबईत ८ व ९ सप्टेंबर रोजी ५००हून अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात येणार असून यंदा संघमालकांची मर्यादा ४.४ कोटींवरून ५ कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये अ, ब, क, ड अशा चार श्रेणी असून, त्यामध्ये अष्टपैलू, बचावपटू, चढाईपटू असे गट करण्यात आले आहेत. अ-श्रेणीसाठी ३० लाख, ब-श्रेणीसाठी २० लाख, क-श्रेणीसाठी १३ लाख आणि ड-श्रेणीसाठी ९ लाख अशी मूलभूत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील अंतिम दोन संघांतील २४ खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात येणार आहे.

मशाल स्पोर्ट‌्सचे लीग प्रमुख अनुपण गोस्वामी म्हणाले, “लीगचे १०वे पर्व हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे लिलावापासून या १०व्या पर्वाचे आकर्षण राहील. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी आमचे १२ फ्रँचाईजी मालक सज्ज आहेत.” यू मुम्बा, बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पँथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तमीळ थलायव्हाज, तेलुगू टायटन्स आणि यूपी योद्धा हे १२ संघ नेहमीप्रमाणे स्पर्धेत सहभागी होतील. जयपूरने पुण्याला नमवून नवव्या हंगामाचे जेतेपद मिळवले. त्यांचे ते दुसरे जेतेपद होते.

असे असतील नियम
लीगच्या धोरणांनुसार फ्रँचाईजी मालकांना नवव्या हंगामातील सहा खेळाडू संघात कायम ठेवण्याचा अधिकार असेल.
लिलावादरम्यानही संघमालकांना फायनल बीड मॅच (एफबीएम) हे कार्ड वापरून एखाद्या खेळाडूला संघात कायम ठेवता येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in