
आयसीसी टी-२० प्लेअर रँकिंगमधील पहिले स्थान पटकाविण्याची रस्सीखेच स्पर्धा आणखीनच अटीतटीची झाली आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवने आणि टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवानला तगडे आव्हान दिले आहे. या दोघांच्या रेटिंगमधील अंतर आता अवघे १६ इतकेच राहिले आहे. सूर्यकुमार यादव रिझवानचे अव्वल स्थान हिसकावून घेण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेबरोबरच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० देखील मालिका नुकतीच संपली. या मालिकानंतर रिझवान-सूर्यकुमार यांच्यात आता अव्वल स्थानासाठी चढाओढ लागणार आहे.
सूर्यकुमारने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दोन अर्धशतकांसह ११९ धावा केल्या होत्या. तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याने ८३८ रेटिंग मिळवत आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळविले. तो मोहम्मद रिझवानच्या (८५४) अवघ्या १६ पॉईंट मागे आहे. त्यामुळे सूर्यकुमार आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये रिझवानचे अव्वल स्थान हिसकावून घेण्याची दाट शक्यता आहे.
रिझवानने इंग्लंडविरूद्धच्या सात सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३१६ धावा केल्या होत्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. रिझवानला सहाव्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याला सातव्या सामन्यात अवघी एक धाव करता आली होती. याचा फायदा उठवून सूर्यकुमार यादवला रिझवानचे पहिले स्थान हिसकावण्याची नामी संधी होती; पण त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या आठ धावाच करता आल्या.