IPL 2024 : मनोरंजनाची पर्वणी आजपासून; चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात उद्घाटनाची लढत

गेल्या मोसमात जेतेपद पटकावल्यानंतर चेन्नईचा संघ पहिल्यांदाच ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. धोनीने कर्णधारपदाची माळ ऋतुराजच्या गळ्यात घालण्याचा निर्णय घेतला असला तरी चेन्नईला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.
IPL 2024 : मनोरंजनाची पर्वणी आजपासून; चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात उद्घाटनाची लढत
Published on

नवी दिल्ली : एकीकडे परीक्षांची धामधूम सुरू असताना, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आयपीएलच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. आतापर्यंत न जाणवणाऱ्या उन्हाळ्याच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची परीक्षेतून मुक्तता होणार आहे. त्यामुळे मनोरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजेच आयपीएलची पर्वणी त्यांच्यासाठी लाभणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्याने आयपीएलचे बिगुल वाजणार आहे.

एकीकडे महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदावरून पायऊतार होण्याचा घेतलेला निर्णय त्याच्या निवृत्तीचे संकेत देत असतानाच, विराट कोहलीला गेल्या १६ वर्षांपासून जेतेपद मिळवता न आल्याचे बोचणारे शल्य, ऋषभ पंतला भीषण अपघातानंतरही मिळालेले दुसरे आयुष्य तसेच पाच जेतेपदे मिळवून दिल्यानंतरही कर्णधारपदावरून उचलबांगडी झाल्यावर रोहित शर्माला होणाऱ्या वेदना... या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे कार्निव्हल शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गेल्या मोसमात जेतेपद पटकावल्यानंतर चेन्नईचा संघ पहिल्यांदाच ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. धोनीने कर्णधारपदाची माळ ऋतुराजच्या गळ्यात घालण्याचा निर्णय घेतला असला तरी चेन्नईला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही जेतेपदावर मोहर उमटवता आली नसली तरी महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने बंगळुरूला पहिलेवहिले आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. त्यामुळे आता पुरुषांचा संघही यंदाचा मोसम संस्मरणीय करण्यासाठी झटणार आहे.

चेन्नईने यंदाच्या मोसमात डेव्हॉन कॉनवेच्या जागी न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर डॅरिल मिचेल या न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूलाही त्यांनी आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. त्याचबरोबर ऋतुराज, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे या फलंदाजांची जोड त्यांना लाभली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आणि फिरकी गोलंदाजांच्या समावेशामुळे एमए चिदंबरम स्टेडियमवर विजयाचे खाते खोलण्यासाठी चेन्नईचा संघ सज्ज झाला आहे. त्यांच्याकडे रवींद्र जडेजा, मिचेल सान्तनेर, मोईन अली आणि महेश तीक्ष्णा यांसारखे फिरकीपटूही आहेत. श्रीलंकेचा मथिशा पथिराना मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याची उणीव दीपक चहर, शार्दूल ठाकूर आणि मुस्तफिझूर रहमान यांना भरून काढावी लागणार आहे.

विराट कोहली जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ यंदा आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, आकाश दीप आणि रीस टॉपले यांसारखे वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

  • चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शैक रशीद, मिचेल सान्तनेर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरील मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान आणि अविनाश राव अरावेली.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ ड्यू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोरमोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयांक डगर, विजयकुमार वैश्य, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करण, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

आयपीएल २०२४ चे वेळापत्रक

  • २२ मार्च - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - सायं. ७.३० वा.

  • २३ मार्च - शनिवार - पंजाब किंग्ज वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३.३० वा.

  • २३ मार्च - शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद - सायं. ७.३० वा.

  • २४ मार्च - रविवार -राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स - दुपारी ३.३० वा.

  • २४ मार्च - रविवार - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स - सायं. ७.३० वा.

  • २५ मार्च - सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्ज - सायं ७.३० वा.

  • २६ मार्च - मंगळवार - चेन्नई सुपर किंग्ज वि. गुजरात टायटन्स - सायं. ७.३० वा.

  • २७ मार्च - बुधवार - मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद - सायं. ७.३० वा.

  • २८ मार्च - गुरुवार - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स - सायं. ७.३० वा.

  • २९ मार्च - शुक्रवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स - सायं. ७.३० वा.

  • ३० मार्च - शनिवार - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्ज - सायं. ७.३० वा.

  • ३१ मार्च - रविवार - गुजरात टायटन्स वि. सनरायजर्स हैदराबाद - दुपारी ३.३० वा.

  • ३१ मार्च - रविवार -दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज - सायं. ७.३० वा.

  • १ एप्रिल - सोमवार - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - सायं. ७.३० वा.

  • २ एप्रिल - मंगळवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स - सायं. ७.३० वा.

  • ३ एप्रिल - बुधवार - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स - सायं. ७.३० वा.

  • ४ एप्रिल - गुरुवार - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्ज - साय. ७.३० वा.

  • ५ एप्रिल - शुक्रवार - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज - सायं. ७.३० वा.

  • ६ एप्रिल - शनिवार - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - सायं. ७.३० वा.

  • ७ एप्रिल - रविवार - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - दुपारी ३.३० वा.

  • ७ एप्रिल - रविवार - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स - सायं. ७.३० वा.

ॲडम झाम्पाची माघार

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ॲॅडम झाम्पा याने वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. ॲॅडम झाम्पा राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणार होता, मात्र आता विश्रांती मिळावी म्हणून त्याने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने मिनि-लिलावात दोन फिरकीपटूंना आपल्या ताफ्यात घेतले होते, त्यात झाम्पाचा समावेश होता. १.५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेल्या झाम्पाने २०२३च्या मोसमात सहा सामन्यांत आठ विकेट्स मिळवले होते. यापूर्वी ते २०१६ आणि २०१७मध्ये राजझिंग पुणे सुपरजायंट्स आणि २०२०मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता.

चेन्नई, मुंबई जेतेपदासाठी फेव्हरिट

तब्बल पाच जेतेपदे आपल्या नावावर असणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलसाठी जेतेपदाकरिता फेव्हरिट समजले जात आहेत. दोन्ही संघांमध्ये नेतृत्वाबाबत खांदेपालट झाले असले तरी जुने कर्णधार अद्यापही संघात असल्यामुळे त्यांना विजेतेपदाची संधी आहे. रचिन रवींद्र चेन्नईच्या ताफ्यात सामील झाल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे. दुसरीकडे हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई संघात परतल्याने त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर क्रिकेटव्यतिरिक्त अन्य गोष्टींमुळेच सध्या चर्चेत असला तरी आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट कोहली उत्सुक आहे.

logo
marathi.freepressjournal.in