मुंबईत १३ फेब्रुवारीपासून रंगणार आजवरची सर्वात मोठी कॅरम स्पर्धा; महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी तब्बल ७ लाखांची रोख पारितोषिके

या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला थेट स्पर्श करून ती कठीण करता येणार नाही.
मुंबईत १३ फेब्रुवारीपासून रंगणार आजवरची सर्वात मोठी कॅरम स्पर्धा; महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी तब्बल ७ लाखांची रोख पारितोषिके

ऋषिकेश बामणे/मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पहिल्यावहिल्या ‘महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तब्बल ५०३ खेळाडूंनी नाव नोंदवलेल्या या स्पर्धेत ७ लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. कॅरमच्या इतिहासात कोणत्याही स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथमच इतक्या लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे, हे विशेष.

फक्त पुरुष एकेरी गटात रंगणारी ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉल, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे खेळवण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्याला १ लाख ५० हजार आणि ट्रॉफी, तर उपविजेत्याला १ लाख व ट्रॉफी देण्यात येईल. यासाठी नोंदणी शुल्क प्रत्येक खेळाडूसाठी १ हजार इतकी होती. त्याशिवाय या स्पर्धेतील पहिल्या ३२ खेळाडूंना एकंदर रोख पारितोषिकाने गौरवण्यात येईल. या स्पर्धेसाठी कॅरमच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. ते फक्त या स्पर्धेपुरताच मर्यादित असतील. श्रीलंका, मालदीव, सिंगापूर या देशांव्यतिरिक्त भारताच्या १८ राज्यांतील एकूण ५०३ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. भारताचे प्रशांत मोरे, योगेश परदेशी, संदीप दिवे असे तारांकित तसेच विश्वविजेते कॅरमपटू या स्पर्धेत दिसणार आहेत. संघटनेच्या यूट्यूब वाहिनीवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

स्पर्धेचे उद‌्घाटन मंगळवार, १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून मल्लखांबाचे आधारस्तंभ पद्मश्री उदय देशपांडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक हेसुद्धा यावेळी उपस्थित असतील. तसेच अन्य राज्यांतील तसेच देशांतील महिलांचा अधिक प्रतिसाद लाभला, तर पुढील वेळेस महिलांसाठीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

पहिल्या फेरीपासून व्हाईट व ब्लॅक स्लॅमला १ हजार, तर उपांत्यपूर्व फेरीपासून प्रत्येक व्हाईट व ब्लॅक स्लॅमला २ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

६ बोर्डचे प्रत्येकी २५ गुणांचे ३ सेट स्पर्धेत असतील. त्यामुळे सामने कमी वेळेत संपतील.

या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला थेट स्पर्श करून ती कठीण करता येणार नाही. खेळाडूने असे केल्यास पंच ती सोंगटी पुन्हा त्याच जागेवर ठेवेल व असे करणाऱ्या खेळाडूचा फाऊल देऊन त्याची १ सोंगटी दंड म्हणून काढण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in