पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेटयुद्धाची पर्वणी! आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने

हा सामना पाहण्यासाठी क्रीडारसिक आतुर आहेत. मात्र वरुणराजा या लढतीत चाहत्यांचा हिरमोड करण्याची दाट शक्यता आहे.
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेटयुद्धाची पर्वणी! आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने

पालेकेले : कँडी येथील पालेकेले स्टेडियमच्या रणभूमीवर शनिवारी भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील महाद्वंद्व पाहण्यासाठी अवघे क्रीडा विश्व सज्ज झाले आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात जेव्हा उभय संघ आमनेसामने येतील, तेव्हा साहजिकच देशवासीयांच्या नजरा या लढतीकडे वळतील. प्रामुख्याने भारताची आघाडीची फळी विरुद्ध पाकिस्तानचा वेगवान मारा यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासाठी क्रीडारसिक आतुर आहेत. मात्र वरुणराजा या लढतीत चाहत्यांचा हिरमोड करण्याची दाट शक्यता आहे.

वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, ठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटांचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७६ वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकून आहे. राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या दशकभरापासून उभय संघांमधील सामन्यांची संख्या रोडावली आहे. शनिवारी मात्र पुन्हा एकदा चाहत्यांना यांच्यातील क्रिकेटयुद्धाची पर्वणी अनुभवता येणार आहे. अ-गटात दोन्ही संघांचा समावेश असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या लढतीद्वारे अभियानाचा प्रारंभ करणार आहे, तर बाबर आझमच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने सलामीच्या सामन्यात नेपाळचा फडशा पाडल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावलेला आहे.

भारतात ५ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या निमित्ताने यंदा आशिया चषक एकदिवसीय प्रकारात म्हणजेच ५० षटकांच्या सामन्यानुसार खेळवण्यात येत आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. मात्र पावसामुळे लढतीला विलंब झाला तरी कमी षटकांच्या सामन्यातील थरार तसूभरही कमी होणार नाही, हे तितकेच खरे. ऑक्टोबर २०२२मध्ये टी-२० विश्वचषकात झालेल्या त्या रोमहर्षक लढतीनंतर प्रथमच भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्यामुळे एकूणच या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान, सलमान अघा, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, हॅरीस रौफ, शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफिक, उसामा मीर, मोहम्मद हॅरीस, फहीम अशरफ, मोहम्मद वासिम, सौद शकील, तय्यब ताहिर.

आघाडीची फळी विरुद्ध वेगवान त्रिकुट

रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ, नसीम शाह या पाकिस्तानी त्रिकुटाच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. विशेषत: डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासमोर भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. २०२१च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान माऱ्यासमोर भारताची भंबेरी उडाली होती. मात्र २०२२मध्ये भारताने त्यांच्यावर काहीसे वर्चस्व मिळवले. गेल्या टी-२० विश्वचषकात कोहलीने हॅरीस रौफला सरळ लगावलेला षटकार चाहत्यांना आजही स्मरणात आहे. आता एकदिवसीय प्रकारात ४ वर्षांनी उभय संघ आमनेसामने येणार आहेत.

भारत

चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार?

के. एल. राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार आहे, हे स्पष्ट असल्याने त्याच्याऐवजी इशान किशन यष्टिरक्षकाची भूमिका बजावेल. अशा स्थितीत किशन चौथ्या स्थानी येणार की मुंबईकर श्रेयस अय्यरला पुन्हा त्याच्या नियमित क्रमांकावर फलंदाजीस पाठवणार, हे पाहणे रंजक ठरेल.

बुमराचे पुनरागमन; गोलंदाजी बळकट

जसप्रीत बुमरा गतवर्षी आशिया चषक तसेच टी-२० विश्वचषकाला मुकला. मात्र आता त्याच्या पुनरागमनामुळे भारताच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढली आहे. बुमराच्या साथीने मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी या दोघांनाही संधी मिळू शकते. कुलदीप यादव फिरकीपटूची धुरा वाहेल. रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याचे अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहेत.

पाकिस्तान

बाबर, रिझवानला रोखण्याचे आव्हान

बाबर आझम व मोहम्मद रिझवान सातत्याने धावा करत आहेत. त्याशिवाय इफ्तिकाह अहमदनेसुद्धा नेपाळविरुद्ध शतक झळकावून भारतीय गोलंदाजांना इशारा दिला आहे. फखर झमान, इमाम उल हक यांना लवकर गुंडाळल्यास बाबर-रिझवानवर अतिरिक्त दडपण येऊ शकते.

फिरकीपटूही लयीत

लेगस्पिनर शादाब खानने नेपाळविरुद्ध ४ बळी पटकावले असून त्याच्या साथीने मोहम्मद नवाझ फिरकीची बाजू सांभाळेल. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासहच त्यांची फिरकी जोडीही लयीत आहे. त्यामुळे भारतीय संघाला सर्व बाबींचा योग्य अभ्यास करून मैदानावर उतरावे लागेल.

७-५

आशिया चषकात एकदिवसीय प्रकारातील सामन्यांत भारत-पाकिस्तान १३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी भारताने ७, पाकिस्तानने ५ लढती जिंकल्या आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

एकदिवसीय प्रकारात

एकूण सामने : १३२

भारत विजयी : ५५

पाकिस्तान विजयी : ७३

टाय/रद्द : ४

२२-१७

भारतासाठी २०२३ या वर्षातील एकदिवसीय सामन्यांत कुलदीपने सर्वाधिक २२ बळी मिळवले आहेत, तर पाकिस्तानकडून हॅरीस रौफने यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक १७ बळी मिळवले आहेत.

७५०

भारतसाठी २०२३ या वर्षात एकदिवसीय प्रकारात शुभमन गिलने सर्वाधिक ७५० धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून बाबर आझमने ६८९ धावा केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in