
सप्टेंबर महिन्यात नॉर्वेविरुद्ध होणाऱ्या डेविस चषक लढतीसाठी सुमित नागलचे भारताच्या टेनिस संघात पुनरागमन झाले. दिविज शरणला मात्र भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.
१६ आणि १७ सप्टेंबर रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून नॉर्वेशी दोन हात करणार आहे. सहा खेळाडूंच्या भारतीय संघात रामकुमार रामनाथन, प्रज्ञेश गुणेश्वरन, शशिकुमार मुकुंद, युकी भांब्री आणि सुमित या एकेरीच्या खेळाडूंसह रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. नंदन बाळ यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. रोहित राजपाल हा या लढतीसाठी भारताचा न खेळणारा कर्णधार असेल. सुमितला २०२१मध्ये कंबरेच्या दुखापतीमुळे विविध स्पर्धांना मुकावे लागले होते. परंतु आता तो दुखापतीतून सावरला असून पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. महाराष्ट्राच्या अर्जुन कढेकडे मात्र या स्पर्धेसाठी दुर्लक्ष करण्यात आले.