IND vs ENG, 1st Test: 'बॅझबॉल' विरुद्ध 'स्पिनबॉल'ची उत्कंठा शिगेला; आजपासून पहिल्या कसोटीला प्रारंभ

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे भारताच्या फिरकी महारथींविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागून आहे.
IND vs ENG, 1st Test:  'बॅझबॉल' विरुद्ध 'स्पिनबॉल'ची उत्कंठा शिगेला;  आजपासून पहिल्या कसोटीला प्रारंभ

हैदराबाद : २०२२मध्ये ब्रँडन मॅकलमने इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. तेव्हापासून कर्णधार बेन स्टोक्स आणि मॅकलम यांच्या जोडीने इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटचे रूप पालटले. त्यांनी ‘बॅझबॉल’च्या रूपात कसोटी खेळण्याची नवी शैली विकसित केली. मात्र इंग्लंडच्या संघाची खरी कसोटी भारतीय खेळपट्ट्यांवरच असेल, हे चाहत्यांना तेव्हापासूनच ठाऊक होते. अखेर तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे भारताच्या फिरकी महारथींविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागून आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने अंतिम ११ खेळाडूसुद्धा जाहीर करून टाकले आहेत. एकप्रकारे आपण भारताच्या आव्हानासाठी सज्ज आहोत, असेच इंग्लंडने याद्वारे दर्शवले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने मात्र नाणेफेकीच्या वेळीच अंतिम संघ जाहीर करू, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना चाहत्यांना आणखी चर्चा करण्यास वाव दिला आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मात्र २०१२मध्ये इंग्लंडनेच पिछाडीवरून भारताला नमवून कसोटी मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे यंदाही दोन्ही संघांमध्ये कडवी चुरस अपेक्षित आहे.

भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी सांगितल्याप्रमाणे खेळपट्टी दुसऱ्या दिवसपासून फिरकीपटूंना पोषक ठरेल, असे दिसते. त्यामुळे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या उजव्या-डावखुऱ्या ऑफस्पिनर जोडीसमोर इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांची परीक्षा असेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असून पहिल्या लढतीवर पावसाचे कोणत्याही प्रकारे सावट नसेल.

गेल्या १२ वर्षांपासून भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. यादरम्यान त्यांनी तब्बल १६ मालिका जिंकल्या. त्यांपैकी ७ मालिकांमध्ये निर्भेळ यश साध्य केले, तर ४४ कसोटींमध्ये फक्त ३ सामने गमावले आहेत.

विराटच्या जागी कुणाला पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान द्यावे, याविषयी आम्ही चर्चा केली. अनुभवी खेळाडूकडे परतण्याचा पर्यायही काहींनी सुचवला. मात्र मायदेशातील मालिकांमध्येच युवकांना संधी मिळते. त्यांना घरातच संधी नाही दिली, तर विदेशात ते संघर्ष करू शकतात. त्यामुळे रजत पाटिदारचा विराटच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. - रोहित शर्मा, भारताचा कर्णधार

अश्विनला कसोटी कारकीर्दीतील ५०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १० विकेट्सची गरज आहे. त्याचप्रमाणे जडेजा कसोटीतील ३०० बळी पूर्ण करण्यापासून २५ गडी दूर आहे.

अश्विन-जडेजा जोडीपासून सावध

गेल्या दशकभरापासून भारतीय कसोटी संघाच्या यशात अश्विन आणि जडेजाच्या जोडीने सिंहाचा वाटा उचलला आहे. दोघेही कारकीर्दीच्या विक्रमी टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असून इंग्लंडविरुद्ध मायदेशात त्यांची कामगिरी नेहमीच उत्तम झालेली आहे. विशेषत: अश्विनने २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांतच तब्बल ३२ बळी मिळवून मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलही या दोघांसह खेळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमरा वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. त्याच्यासह मोहम्मद सिराजला प्राधान्य मिळेल. त्यामुळे कुलदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार यांना प्रतीक्षा करावी लागू शकते.

विराटच्या अनुपस्थितीत रोहित, गिलकडे लक्ष

तारांकित फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली आहे. त्यामुळे प्रामुख्याने रोहित आणि युवा शुभमन गिल यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. यशस्वी जैस्वाल रोहित सलामीला येणार असून चौथ्या स्थानी विराटच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. के. एल. राहुल या मालिकेत फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्यामुळे के. एस. भरत यष्टिरक्षकाची भूमिका बजावेल.

बशीरला अखेर व्हिसा मिळाला!

इंग्लंडचा २० वर्षीय ऑफस्पिनर शोएब बशीरला अखेर संघर्षानंतर भारताचा व्हिसा मिळालेला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बशीरची निवड झाली होती. मात्र त्याला व्हिसा न मिळाल्याने अबू धाबी येथून मायदेशी परतावे लागले. इंग्लंडचा संघ भारतात येण्यापूर्वी अबू धाबी येथे काही दिवस सरावासाठी थांबला होता. बशीरचा जन्म इंग्लंडमधील सरे येथील असला तरी त्याचे कुटुंब मूळ पाकिस्तानचे असल्याने त्याच्या व्हिसाच्या मार्गात असंख्य अडथळे येत होते.

तीन फिरकीपटू; अँडरसनला डच्चू

इंग्लंडने रेहान अहमद, टॉम हार्टली आणि जॅक लीच यांच्या रूपात तीन फिरकीपटूंना पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी जेम्स अँडरसनऐवजी त्यांनी मार्क वूडला प्राधान्य दिले आहे. लेगस्पिनर रेहान व पदार्पणवीर डावखुरा ऑफस्पिनर हार्टली प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. लीचला ३५, तर रेहानला फक्त एका कसोटी सामन्याचा अनुभव आहे. फलंदाजीत जॉनी बेअरस्टो, स्टोक्स, ओली पोप व झॅक क्रॉली यांच्या आक्रमक शैलीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. मात्र भरवशाचा जो रूट हा त्यांच्यासाठी भारतीय खेळपट्ट्यांवर हुकमी एक्का ठरेल.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, मुकेश कुमार, आवेश खान.

प्रतिस्पर्धी संघ

इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, जॅक लीच, मार्क वूड.

logo
marathi.freepressjournal.in