पाकिस्तानचा पराक्रम

धोकादायक आणि बेभरवशी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानला गटसाखळीत एक सामना जिंकण्यात यश आले
पाकिस्तानचा पराक्रम

२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मागे सारून आता पुढे जाऊ या. २००९मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात युनिस खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने श्रीलंकेला नमवून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. २००७मध्ये पाकिस्तानला पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र पाकिस्तानने ते अपयश बाजूला सारून जेतेपद मिळवले. आजच्या सदरात पाकिस्तानच्या त्याच पराक्रमाचा घेतलेला हा आढावा.

धोकादायक आणि बेभरवशी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानला गटसाखळीत एक सामना जिंकण्यात यश आले, तर एक लढत त्यांनी गमावली. गटातून दुसऱ्या स्थानासह सुपर-आठमध्ये प्रवेश केल्यावर पाकिस्तानने कामगिरी उंचावली. त्यांनी न्यूझीलंड, आयर्लंड संघांवर वर्चस्व गाजवले. मात्र श्रीलंकेने त्यांना नमवले. तरीही दुसऱ्या स्थानासह पाकिस्तानने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. एकीकडे पाकिस्तान संघ दमदार मजल मारत असताना भारतावर मात्र सुपर-आठमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड या संघांकडून भारताने हार पत्करली.

दरम्यान, उपांत्य फेरीत पाकिस्तानने बलाढ्य आफ्रिकेवर सात धावांनी सरशी साधली आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. यावेळी त्यांच्यासमोर पुन्हा श्रीलंकेचे आव्हान उभे ठाकले. मात्र अब्दुल रझाक आणि स्पर्धेत सर्वाधिक १३ बळी मिळवाणारा उमर गुल यांच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेला २० षटकांत ६ बाद १३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. मग शाहीद आफ्रिदीचे अर्धशतक व शोएब मलिक, कामरान अकमल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे पाकिस्तानने १८.४ षटकांत निर्णायक लक्ष्य दोन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. अशाप्रकारे १९९२नंतर प्रथमच पाकिस्तानने एखादी आयसीसी स्पर्धा जिंकण्याची किमया साधली.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अवघे १२ दिवस शिल्लक असताना पाकिस्तानचा संघ त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. मात्र त्यांना साखळीत भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांसारख्या कडव्या संघांना सामोरे जायचे आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in