फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना या स्टेडियममध्ये रंगणार

फिफा आणि स्थानिक संयोजन समितीने याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा केली.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना या स्टेडियममध्ये रंगणार

आयपीएलचा थरार संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर चाहत्यांना फुटबॉलची मेजवानी मिळणार आहे. भारतात रंगणाऱ्या कुमारींच्या (१७ वर्षांखालील) फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे.

फिफा आणि स्थानिक संयोजन समितीने याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा केली. ११ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून नवी मुंबईसह भुवनेश्वर आणि गोवा येथेही सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. २०२०मध्ये कोरोनामुळे हा विश्वचषक लाबंणीवर पडला. गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे लढती रंगतील. भारतासह ब्राझील, चीन, कोलंबिया, जपान, न्यूझीलंड आणि चिली या संघांनी आतापर्यंत स्पर्धेतील स्थान पक्के केले असून एकूण १६ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.

भुवनेश्वर येथे ११, १४ आणि १७ ऑक्टोबरला भारताचे तीन साखळी सामने होतील. स्पर्धेची अधिकृत कार्यक्रमपत्रिका २४ जूनला जाहीर करण्यात येईल. २१ व २२ ऑक्टोबरला उपांत्यपूर्व, तर २६ ऑक्टोबरला उपांत्य फेरीच्या लढती गोवा येथे होतील. मग ३० तारखेला नवी मुंबईत सातव्या हंगामाचा विजेता गवसणार आहे. भारतात फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची ठरणार असल्याने अवघ्या क्रीडाविश्वाचे या स्पर्धेकडे लक्ष लागलेले असेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in