हेझलवूड-कमिन्सपुढे विंडीजची घसरगुंडी; १८८ धावांतच पहिला डाव संपुष्टात; सलामीवीर स्मिथ स्वस्तात बाद,ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या जोडीपुढे वेस्ट इंडिजचा पहिल्या कसोटीतील पहिला डाव ६२.१ षटकांत १८८ धावांतच संपुष्टात आला.
हेझलवूड-कमिन्सपुढे विंडीजची घसरगुंडी; १८८ धावांतच पहिला डाव संपुष्टात; सलामीवीर स्मिथ स्वस्तात बाद,ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी मालिका

ॲडलेड : जोश हेझलवूड (४४ धावांत ४ बळी) आणि कर्णधार पॅट कमिन्स (४१ धावांत ४ बळी) या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या जोडीपुढे वेस्ट इंडिजचा पहिल्या कसोटीतील पहिला डाव ६२.१ षटकांत १८८ धावांतच संपुष्टात आला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर २१ षटकांत २ बाद ५९ धावा केल्या आहेत.

अॅडलेड येथे सुरू असलेल्या या कसोटीत पहिल्या दिवसाच्या अखेरीस उस्मान खअवाजा (३०) व कॅमेरून ग्रीन (६) खेळपट्टीवर होते. कारकीर्दीत प्रथमच सलामीला उतरणारा स्टीव्ह स्मिथ (१२) व मार्नस लबूशेन (१०) माघारी परतले असून ऑस्ट्रेलिया अद्याप १२९ धावांनी पिछाडीवर आहे. पदार्पणवीर शामर जोसेफने या दोघांना जाळ्यात अडकवले

तत्पूर्वी, पहिल्या डावात विंडीजकडून फक्त किर्क मॅकेन्झीने ५० धावांची झुंज देताना पहिले अर्धशतक झलकावले. कमिन्सने कर्णधार क्रेग ब्रेथवेट (१३), तेगनारायण चंदरपॉल (६), जोशुआ डा सिल्व्हा (६) व अल्झारी जोसेफ (१४) यांचे बळी मिळवले. हेझलवूडने मॅकेन्झी, अलिक अथांझे (१३), कॅव्हेम हॉज (१२) व पदार्पणवीर जस्टीन ग्रीव्ह्ज (५) यांना माघारी पाठवले.

उभय संघांतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच तब्बल १२ फलंदाज बाद झाले.

logo
marathi.freepressjournal.in