बायो बबलमधून बाहेर आल्यानंतरची पहिलीच मालिका त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागणार-ऋतुराज गायकवाड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात ऋतुराजने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले
बायो बबलमधून बाहेर आल्यानंतरची पहिलीच मालिका त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागणार-ऋतुराज गायकवाड

बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अवतीभोवती खूप लोक जमा होतात. ही बायो बबलमधून बाहेर आल्यानंतरची पहिलीच मालिका आहे. त्यामुळे सर्वांनाच या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल, असे मत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने व्यक्त केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात ऋतुराजने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. त्याने धडाकेबाज सुरूवात करत ३५ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला बायो बबलमध्ये असताना आणि बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतरचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी ऋतुराज म्हणाला की, आम्ही बायो बबलमध्ये बराच काळ राहिलो. मात्र यामुळे संघातील बॉडिंग वाढले. मी ज्या कोणत्या संघाकडून खेळलो मग ते आयपीएल असो किंवा टीम इंडिया तेथे सांघिक भावना वाढवण्यासाठी भरपूर उपक्रम राबवण्यात आले. याचा चांगलाच फायदा झाला. येणाऱ्या वर्षात देखील याचा फायदा होईल.

तो पुढे म्हणाला की, बायो बबलमधील बंदिस्त वातावरणात लोकांशी संपर्क नव्हता. त्यामुळे बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अनेक चाहते जवळ येत आहेत. अनेक गोष्टींची मागणी करतात. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मन विचलितदेखील होते. त्यामुळे बायो बबलचे काही फायदे आणि तोटेही आहेत. माझ्या मते हे दोन्ही अनुभव घेतले पाहिजेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in