आज होणार महामुकाबला; दुबईत भिडणार भारत-पाकिस्तान

भारतीय संघ पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे.
आज होणार महामुकाबला; दुबईत भिडणार भारत-पाकिस्तान

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला असून रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बहुप्रतीक्षित महामुकाबला होणार आहे. जगभरातील क्रिकेटरसिकांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे.

भारतीय संघ पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निराशाजनक कामगिरीमुळे विराट कोहलीवर सातत्याने टीका होत असल्याने त्याच्यावर मोठा दबाव असला, तरी त्याला या स्पर्धेत आपला फॉर्म शोधावाच लागेल. पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी करून पूर्ववत ‘हिरो’ ठरण्याची त्याला नामी संधी आहे. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा कोहलीचा प्रयत्न राहील. भारतालाही आपले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांची उणीव जाणवण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात मोहम्मद रिझवानने याच मैदानावर शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळीसुद्धा त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकात खेळत नसल्याने त्याची उणीव पाकिस्तानला भासणार आहे.

नवीन जर्सीची नवलाई

आशिया चषकासाठी भारतीय संघाला नवीन जर्सी मिळाली आहे. या जर्सीचा रंग निळाच असला, तरी जर्सीवर निळ्या रंगाचे पट्टे दिसतात. जर्सीच्या डाव्या बाजूला स्पर्धेचे नाव पांढऱ्या अक्षरांमध्ये लिहिण्यात आले आहे. या जर्सीवर तीन स्टार ठेवण्यात आलेले आहेत. भारताने आतापर्यंत तीन वेळा विश्वचषक विजेतेपद मिळविले होते. त्याचा समावेशही जर्सीमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर या जर्सीचा एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. त्यामुळे आता ही जर्सी खेळाडूंना कशी शोभते, ते पाहण्याची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना लागलेली आहे.

प्लेइंग इलेव्हन’बाबत बीसीसीआयचे ट्विट

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हायव्होल्टेज सामना होणार असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १० खेळाडूंचे फोटो ट्विट करत टीम इंडियाची ‘प्लेइंग इलेव्हन’ कशी असेल, याचे संकेत दिले आहेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान.

खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी अनुकूल राहणार असल्याचे सांगण्यात येते. नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण पसंत करण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही. तापमान २८ अंश सेल्सियस ते ४१अंश सेल्सियस राहील.

logo
marathi.freepressjournal.in