मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामासाठीचा खेळाडूंचा दोन दिवसीय लिलाव शुक्रवारी पूर्ण झाला. या दोन दिवसीय लिलावाच्या अ-श्रेणीत समावेश असलेला चढाईपटू सचिन तन्वर यंदाच्या पर्वातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. त्याला तमिळ थलायव्हाज संघाने २.१५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तसेच या दोन दिवसांत ८ खेळाडूंवर १ कोटींहून अधिक बोली लावण्यात आली.
पहिल्या दिवशी ‘अ’ गटात समावेश असलेल्या चढाईपटू सचिनने सर्वांचे लक्ष वेधले. त्याला तमिल थलायवाजने २.१५ कोटी रुपये खर्ची करून संघात घेतले. कोट्यवधी खेळाडूंमध्ये भारताच्या सात तर, इराणच्या एका खेळाडूचा समावेश आहे. सचिननंतर इराणचा अष्टपैलू मोहम्मरेझा चियानेह २.०७ कोटी रुपयांसह हरियाणा स्टीलर्स संघाकडे गेला. चढाईपटू गुमान सिंगही तब्बल १.९७ कोटी रुपयांना गुजरात जायंट्स संघाच्या ताफ्यात सहभागी झाला. यानंतर फायनल बीड मॅचच्या (एफबीएम) माध्यमातून पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने १.७२५ कोटी रुपयांना घेतले. पवनवर गेल्या हंगामात २.६०५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.
‘ब’ गटात बंगाल वॉरियर्सने अनुभवी मनिंदर सिंगसाठी १.१५ कोटी रुपये खर्ची घातले. महाराष्ट्राचा चढाईपटू अजिंक्य पवारला बंगळूरु बुल्सने १.१०७ कोटी रुपयांना सहभागी केले. शुभम शिंदेला पाटणा पायरेट्सने ७० लाख व सिद्धार्थ देसाईला २६ लाखांना दबंग दिल्लीने खरेदी केले.