क्रिकेट हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना आतापर्यंत राबवण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची लोकप्रियता एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीपासून आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (प्रभावशाली खेळाडू) ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यादरम्यान दोन्ही संघांना १४व्या षटकाचा खेळ होईपर्यंत एक खेळाडू बदलता येणार आहे. त्यामुळे चारपैकी एका राखीव खेळाडूला प्रत्यक्ष मैदानात खेळण्याची संधी मिळणार आहे.
आतापर्यंत अंतिम ११ जणांमधील एका खेळाडूला दुखापत झाली तर राखीव खेळाडूला फक्त क्षेत्ररक्षणासाठी संधी दिली जायची. मात्र आता राखीव खेळाडूला पूर्ण फलंदाजी करण्याची तसेच आपला चार षटकांचा कोटा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
पुढील वर्षीच्या म्हणजेच आयपीएलच्या १६व्या पर्वात हा नवा प्रयोग राबवला जाणार आहे. मात्र त्याआधी ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक स्पर्धेत या प्रयोगाची चाचणी घेतली जाणार आहे. फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, बेसबॉल यांसारख्या खेळात बदली खेळाडूला कोणत्याही क्षणी मैदानात पाठवण्याचा नियम आहे. आता हीच संकल्पना क्रिकेटमध्येही राबवण्यात येणार आहे. यामुळे फक्त प्रेक्षकांनाच नव्हे तर सहभागी संघांनाही मैदानात प्रत्यक्ष रणनीती आखताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
- प्रत्येक टी-२० सामन्यादरम्यान दोन्ही संघांना मैदानावरील एक खेळाडू बदलण्याची संधी मिळेल.
- फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल यांसारख्या खेळांपासून प्रेरणा घेत बीसीसीआयने ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आयपीएलमध्ये प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याआधी बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला मैदानावरील सामान्य खेळाडूप्रमाणेच फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मिळेल.
- प्रत्येक डावातील १४ षटकांचा खेळ पूर्ण होण्याआधी केव्हाही ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला मैदानावर उतरवता येईल.
- मैदानात आल्यानंतर हा खेळाडू फलंदाजी अथवा चार षटके गोलंदाजी करू शकेल.
- ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला सादर करण्याआधी त्याबाबतची कल्पना मैदानावरील पंचांना अथवा चौथ्या पंचांना द्यावी लागेल.