इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलूंची प्रगती थांबली! भारतीय संघाचा कर्णधार रोहितचे स्पष्ट मत

शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांसारखे खेळाडू फक्त फलंदाजी करत आहेत, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.
 इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलूंची प्रगती थांबली! भारतीय संघाचा कर्णधार रोहितचे स्पष्ट मत

नवी दिल्ली : आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमाला माझा फारसा पाठिंबा नाही. यामुळे अष्टपैलूंच्या प्रगतीला खिळ बसली असून याचा भारतीय संघालाही फटका बसण्याची शक्यता आहे. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांसारखे खेळाडू फक्त फलंदाजी करत आहेत, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

२ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील अष्टपैलू कोण, यावर सध्या सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असला तरी तो लयीत दिसलेला नाही. तर चेन्नईचा दुबे, हैदराबादचा सुंदर तसेच कोलकाताचा वेंकटेश अय्यर फक्त फलंदाजी करत आहेत. त्यांना गोलंदाजीची संधी देण्यात आलेली नाही. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे संघ एखाद्या परिपूर्ण गोलंदाजाला स्थान देऊन फलंदाजाला बाहेर करत आहेत. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झालेले आहे. आयपीएलमध्ये २०२३च्या हंगामापासून हा नियम लागू करण्यात आला. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

“इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे सामन्यात रंगत निर्णाण होते, हे मान्य आहे. मात्र मला हा नियम फारसा आवडलेला नाही. यामुळे भारतीय अष्टपैलूंची प्रगती खुंटली आहे. चाहत्यांच्या मनोरंजनासाठी खेळाडूंचा विकास थांबता कामा नये,” असे रोहित म्हणाला. मायकेल वॉन आणि ॲडम गिलख्रिस्ट या माजी खेळाडूंसोबत एका ऑनलाईन संवाद कार्यक्रमात रोहितने असंख्य मुद्द्यांवर भाष्य केले.

“क्रिकेट हा ११ खेळाडूंचा खेळ आहे. यामध्ये १२व्या खेळाडूची गरज नाही. दुबे, सुंदर, अय्यर हे अष्टपैलू आहेत. मात्र त्यांचा फक्त एकाच कार्यासाठी वापर केला जात आहे. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने हा नियम घातक आहे. प्रतिस्पर्धी संघाला ४-५ षटकांत विजयासाठी ६० धावांची आवश्यकता असेल व त्यांचे ६ फलंदाज बाद झाले असतील. तर तुम्ही सामना जिंकला आहे, असे तुम्हाला वाटते. मात्र अशा वेळी इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाद्वारे एखादा चांगला फलंदाज येतो व सामना तुमच्याकडून हिरावतो. त्यामुळे याचा गोलंदाजांवरही परिणाम होतो,” असेही मुंबई इंडियन्सचा ३६ वर्षीय सलामीवीर रोहितने नमूद केले.

मुंबईतील सामन्यांच्या वेळी कुटुंबीयांसह राहतो!

रोहितकडून मुंबईचे कर्णधारपद हार्दिककडे देण्यात आल्याने असंख्य वाद निर्माण झाला होता. याविषयी रोहित म्हणाला की, “आम्ही सलग चार सामने वानखेडेवर खेळलो. यादरम्यानच्या काळात मी कुटुंबासह घरी राहिलो. फक्त सामन्याच्या दिवशी तसेच प्रत्येक दिवशी सरावाच्या वेळी मात्र मी वेळेवर स्टेडियम गाठायचो,” असे रोहित म्हणाला.

कार्तिक, धोनी यांना राजी करणे कठीण!

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील यष्टिरक्षक कोण, यासाठी अद्याप चुरस सुरू आहे. असंख्य खेळाडू शर्यतीत असताना गिलख्रिस्टने दिनेश कार्तिक व महेंद्रसिंह धोनी यांचीही नावे घेतली. हे दोघेही यंदा लयीत आहेत, असे गिलख्रिस्ट म्हणाला असता रोहितने त्यावर मजेशीर उत्तर दिले. “धोनी नक्कीच विश्वचषकासाठी अमेरिकेत येईल. मात्र क्रिकेट खेळण्यासाठी नाही, तर गोल्फचा आनंद लुटण्यासाठी. त्या तुलनेत कार्तिकला टी-२० विश्वचषकासाठी राजी करणे काहीसे सोपे ठरेल,” असे रोहित म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in