पंत, जुरेलपैकी कुणाला संधी? न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी

निवड समितीने दोन यष्टीरक्षकांना संधी देण्याचे ठरवल्यामुळे आता भारतीय संघात ऋषभ पंत आणि ध्रूव जुरेल यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पंत, जुरेलपैकी कुणाला संधी? न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी
पंत, जुरेलपैकी कुणाला संधी? न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी
Published on

नवी दिल्ली : लोकेश राहुलला पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान मिळणार आहे. निवड समितीने दोन यष्टीरक्षकांना संधी देण्याचे ठरवल्यामुळे आता भारतीय संघात ऋषभ पंत आणि ध्रूव जुरेल यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची शनिवारी ३ जानेवारीला बैठक होणार असून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज तसेच निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर त्याचबरोबर शिवसुंदर दास, अजय रात्रा, रुद्रप्रताप सिंग आणि प्रग्यान ओझा या विद्यमान निवड समितीची बैठक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ७ जानेवारीला भारतीय संघाचे बडोदा येथे सराव शिबीर होणार आहे. त्यानंतर ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या बैठकीत पंतला संधी द्यायची की ध्रूव जुरेल याला पदार्पणाची संधी द्यायची, याविषयी चर्चा केली जाणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदानंतर ऋषभ पंत २०२५मध्ये एकही वनडे सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्पेशालिस्ट सलामीवीर असतानाही पंतच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आले. निवड समितीतील एक जण पंतच्या अतिआक्रमक फलंदाजीविषयी अनुत्सुक असल्याचे समजते. पंतच्या आक्रमक फलंदाजीचे धोके अधिक असल्यामुळे शास्त्रशुद्ध फलंदाजाला संधी द्यायची, असा निवड समितीतील एका सदस्याचा कल आहे. त्यामुळे पंतला वनडे संघात स्थान मिळणे कठीण वाटत आहे.

२०१८ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पंतने आतापर्यंत ३१ सामने खेळले असून त्याचा हा प्रवास दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. ३० जून २०१९ ते १४ जानेवारी २०२० (कोरोनाच्या आधी) दरम्यान तो ११ एकदिवसीय सामने खेळला. त्याचा सर्वोत्तम दुसरा टप्पा २६ मार्च २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंतचा होता. त्यानंतर एका भीषण अपघाताला त्याला सामोरे जावे लागले. दुसऱ्या टप्प्यात मात्र पंतने जबरदस्त कामगिरी करत एक शतक, दोन वेळा ७५पेक्षा अधिक धावांची खेळी आणि एकदा ८५पेक्षा अधिक धावा फटकावल्या होत्या. अपघातानंतर २०२४मध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतला मात्र फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. योगायोगाने गौतम गंभीरची प्रशिक्षकपदाखाली नियुक्ती झाल्यानंतरचा तो भारताचा पहिलाच सामना होता. या सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता न आल्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या भविष्यातील टीममधून तो बाहेर पडला. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतही त्याला फारशी छाप पाडता आलेली नाही. चार सामन्यांत त्याला एकदाच ७० धावांची खेळी करता आली. त्याउलट झारखंडचा डावखुरा फलंदाज इशान किशन आग ओकत असून धावांची लयलूट करत आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठी संधी मिळालेल्या इशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही स्थान द्यावे, असा मतप्रवाह आहे.

ध्रूव जुरेलने उत्तर प्रदेशकडून खेळताना खणखणीत शतक झळकावले आहे. मात्र बंगळुरूतील पाटा खेळपट्ट्यांवर त्याने केलेली खेळी किती ग्राह्य धरणार, हा प्रश्न आहे. जुरेलपेक्षा पंतचे पारडे नेहमीच जड ठरले आहे. मात्र या चर्चेत आता इशान किशनची एंट्री झाल्यामुळे पंत किंवा जुरेलपेक्षा किशनच वरचढ ठरतोय का, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.

भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त झाला नसल्यामुळे देवदत्त पडिक्कलला संघात स्थान देण्याविषयी निवड समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पडिक्कलने ३७ सामन्यांत ९२च्या सरासरीने धावा कुटल्या असून विजय हजारे करंडक स्पर्धेत चार सामन्यांत तीन शतके झळकावली आहेत. त्यातच कर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन होणार असून गेल्या सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वाल हासुद्धा संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व प्रयत्नांत पडिक्कलला १५ जणांच्या संघात स्थान देताना निवड समितीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बुमरा, पंड्याला विश्रांती

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा विचार करता, अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार आहे. त्यांच्या जागी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हासुद्धा संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असला तरी भविष्यातील संघबांधणीच्या दृष्टीने त्याला संघात कितपत संधी मिळते, याचे उत्तर फक्त निवड समितीकडे असेल. फिरकीपटूंमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचे संघातील स्थान निश्चित असेल.

संभाव्य संघ : शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, श्रेयस अय्यर किंवा देवदत्त पडिक्क्ल.

logo
marathi.freepressjournal.in