साउंड रनिंग मीटमध्ये भारताच्या या महिला खेळाडूने राष्ट्रीय विक्रम रचला

पारूलने ८ मिनिटे ५७.१९ सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरा क्रमांक पटकाविला.
साउंड रनिंग मीटमध्ये भारताच्या या महिला खेळाडूने राष्ट्रीय विक्रम रचला
Published on

भारतीय धावपटू पारूल चौधरीने लॉस एंजल्समध्ये सनसेट टूर येथे साउंड रनिंग मीटमध्ये राष्ट्रीय विक्रम रचला. तिने महिलांच्या तीन हजार मीटर्स स्पर्धेत नऊ मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी ती भारताची पहिली ॲथलिट ठरली.

पारूलने ८ मिनिटे ५७.१९ सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरा क्रमांक पटकाविला. पारूलने सहा वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सूर्या लोंगनाथनने ९ मिनिटे ४.५ सेकंद वेळ घेत केलेला विक्रम मोडीत काढला.

शर्यतीत पारूल पाचव्या स्थानावर होती. परंतु अंतिम दोन टप्प्यात तिने मुसंडी मारली. जोरदार कामगिरी करत पोडियमवर जागा मिळविली.

तीन हजार मीटर्सला ऑलिम्पिकमध्ये स्थान नसल्याने या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहसा भाग घेत नाहीत.

पारूलचा या महिन्यात अमेरिकेत ओरेगन येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तिने गेल्या महिन्यात चेन्नईत राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये महिला गटात तीन हजार मीटर्स स्टीपलचेसचे विजेतेपद पटकाविले होते.

logo
marathi.freepressjournal.in