
राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी नवव्या दिवशी महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईलमध्ये भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्तिन लेमोफॅक लेटिचिडजिओ हिच्यावर १२-२ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकाविले.
पूजाची सुरूवात निराशाजनक झाली होती. ख्रिस्तिनने पहिल्याच फेरीत २-० अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर गेहलोतने गटलेज डाव खेळत जोरदार मुसंडी मारली. तिने ख्रिस्तिनच्या पायावर पकड मजबूत करून तिला गोल फिरविले. पूजाने ख्रिस्तिनला पाचवेळा गोल फिरविल्यामुळे तिच्या खात्यात १० गुण जमा झाले. त्यानंतर पहिल्या फेरीत १०-२ ने आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीत पूजाने लगेचच दोन गुण मिळवत सामना १२-२ असा जिंकून भारताला कुस्तीत आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले.