भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा बंदी घालावी -बजरंग

वाढता शासकीय हस्तक्षेप तसेच वेळेत निवडणूक न घेतल्याचे कारण देत जागतिक महासंघाने ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती.
भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा बंदी घालावी -बजरंग

नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती महासंघाला (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघावर (डब्ल्यूएफआय) पुन्हा बंदी घालण्याची विनंती केली आहे.

गेल्या वर्षभरापासून भारतीय कुस्ती महासंघ विविध कारणांनी चर्चेत आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली साक्षी मलिक, बजरंग, विनेश फोगट यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी सातत्याने आंदोलने केली. बृजभूषण यांना अटक व्हावी तसेच शासनाकडून न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपापली पदके व प्रतिष्ठेचे पुरस्कारही परत केले. त्याशिवाय साक्षीने कुस्तीतून निवृत्ती पत्करली.

यादरम्यान वाढता शासकीय हस्तक्षेप तसेच वेळेत निवडणूक न घेतल्याचे कारण देत जागतिक महासंघाने ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. अखेर १३ फेब्रुवारी रोजी ही बंदी काढण्यात आली. मात्र ही बंदी उठवतानाच जागतिक महासंघाने भारतीय महासंघाकडून कुस्तीपटूंशी कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही, असे लिखित स्वरूपात मागितले आहे. बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हे महासंघ बरखास्त करून हंगामी समितीची स्थापना केली होती.

“संजय सिंह व त्यांच्या जवळच्या माणसांची दादागिरी पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे भारतीय कुस्तीपटूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. जागतिक महासंघाने बंदी उठवल्यामुळे संजय सिंह अनधिकृतपणे कुस्त्या स्पर्धांचे आयोजन करण्याची तयारी करत आहेत. तसेच हंगामी समितीशी संबंधित असणाऱ्यांना धमकावतही आहेत,” असे बजरंग म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in