पहिल्या कसोटी सामन्यात आतापर्यंतच्या खेळात कांगारूंची आघाडी १०१ धावांची

पावसामुळे वेळ वाया गेला असला तरी या सामन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
पहिल्या कसोटी  सामन्यात आतापर्यंतच्या खेळात कांगारूंची आघाडी १०१ धावांची

गाले येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ३१८ धावा केल्या असून आतापर्यंतच्या खेळात कांगारूंची आघाडी १०१ धावांची झाली आहे. कर्णधार पॅट कमिन्स आणि लॅथन लियॉन हे अनुक्रमे २६ आणि ८ धावांवर नाबाद आहेत. श्रीलंकेच्या रमेश मेंडिसने १०७ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. जेफरी वंडरसेने दोन विकेट्स घेतल्या. धनंजय डिसिल्वाने एक फलंदाज बाद केला. दरम्यान, पावसामुळे वेळ वाया गेला असला तरी या सामन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड एकाही धावेची भर न घालता सहा धावांवर बाद झाला. धनंजय डिसिल्वाने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. उस्मान ख्वाजा ७१ धावांवर ३९ व्या षटकांत बाद झाला. ॲलेक्स कॅरीने ४७ चेंडूंत ४५ धावा फटकविल्या, कॅमेरून ग्रीनने १०९ चेंडूंत ७७ धावा करताना सहा चौकार लगावले. मिचेल स्टार्कने १० धावा केल्या.

सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या होत्या. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ५९ षटकांत सर्वबाद २१२ धावा केल्या होत्या. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज नॅथन लायनने २५ षटकांत ९० धावा देत पाच विकेट्स घेतल्या. युवा लेगस्पिनर मिचेल स्वॅपसननेही श्रीलंकेच्या तीन फलंदांजांना बाद केले. कमिन्स आणि स्टार्क यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर २५ वा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेनही १९ चेंहूंत १३ धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथ सहा धावांवर धावबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या डाव अडचणीत आला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ९८ अशी होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in