
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदासाठी भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग मुख्य दावेदार मानला जात आहे. आगामी विंडीज दौऱ्यापूर्वी निवड समितीच्या नव्या अध्यक्षाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता असली तरी सेहवागने उगारलेल्या मानधनवाढीच्या प्रश्नावर बीसीसीआय कोणता तोडगा काढते, हे पाहणे रंजक ठरेल.
भारतीय संघ १२ जुलैपासून विंडीजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय व टी-२० मालिका खेळणार आहे. सध्या शिवसुंदर दास निवड समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषवत असून तेच विंडीज दौऱ्यासाठी भारताची संघ निवड करतील असे अपेक्षित आहे. मात्र तोपर्यंत नव्या अध्यक्षाची निवड नक्कीच होऊ शकते. चेतन शर्मा यांनी फेब्रुवारीत स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय संघाबाबत काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून शिवसुदंर दास यांच्यासह एस. शरथ (दक्षिण), सुब्रतो बॅनर्जी (मध्य) आणि सलील अंकोला (पश्चिम) या चौघांची समिती भारताच्या संघ निवडीचे कार्य करत आहे. मात्र बीसीसीआयने उत्तर विभागातील एकाची अध्यक्षपदासाठी नेमणूक करण्याचा विडा उचलला असून त्यासाठी सेहवागचे नाव आघाडीवर आहे.
सेहवागने काही महिन्यांपूर्वी निवड समिती अध्यक्षाला देण्यात येणारे मानधन कमी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे बीसीसीआय सेहवागचे मन वळवणार की मानधनात वाढ करणार, याचे उत्तर लवकरच कळेल. सेहवागव्यतिरिक्त, माजी यष्टिरक्षक अजय रत्रा हे नावसुद्धा उत्तर विभागातून शर्यतीत आहे. त्याशिवाय समालोचक विवेक राजदानबाबतही बीसीसीआय विचार करू शकते.
निवड समिती सदस्यांचे मानधन
अध्यक्ष : १ कोटी (वार्षिक)
अन्य चार सदस्य : ९० लाख (वार्षिक)
अध्यक्षपदासाठी अट
- क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून किमान ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक.
- कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा फ्रँचायझी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळता येणार नाही. तसेच क्रीडा अथवा वृत्त वाहिन्यांशी करार करण्यास मनाई.
- उत्तर विभागातून गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग यांचेही पर्याय आहेत. मात्र त्यांना निवृत्त होऊन अद्याप पाच वर्षे झालेली नाहीत.