मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत 'या' भारतीय क्रीडापटूंचे स्थान निश्चित

शुक्रवारी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूपुढे चायनीज तैपईच्या ताय झू यिंगचे कडवे आव्हान असेल
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत 'या' भारतीय क्रीडापटूंचे स्थान निश्चित

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या दोन आघाडीच्या भारतीय क्रीडापटूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

महिला एकेरीतील उपउपांत्यपूर्व लढतीत सातव्या मानांकत सिंधूने जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या चीनच्या झांग यी मनचा २१-१२, २१-१० असा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवला. सिंधूने अवघ्या २८ मिनिटांत हा सामना जिंकला. परंतु शुक्रवारी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूपुढे चायनीज तैपईच्या ताय झू यिंगचे कडवे आव्हान असेल. ताय झू यिंगविरुद्धच्या २१पैकी अवघ्या पाच लढती सिंधूने जिंकल्या असून १६ सामने गमावले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन स्पर्धेत ताय झू हिनेच सिंधूला उपांत्यपूर्व लढतीत नमवले होते. त्यामुळे सिंधूला त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

पुरुष एकेरीत बिगरमानांकित प्रणॉयने चायनीज तैपईच्या वांग वेई याच्यावर २१-१९, २१-१६ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली. प्रणॉयने ४८ मिनिटांत हा सामना जिंकला. शुक्रवारी त्याची जपानच्या कांता त्सुनेयामाशी गाठ पडेल. किदम्बी श्रीकांतच्या अनुपस्थितीत प्रणॉयकडून भारतीय चाहत्यांना जेतेपदाची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in