ठाण्याचा झैद, मुंबईची काजल अजिंक्य; राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, उर्मिला शेंडगे यांना उपविजेतेपदावर समाधान

महिलांच्या अंतिम लढतीत काजलने उर्मिलाचा २४-१३, २५-१३ असा सहज दोन सेटमध्येच धुव्वा उडवला.
ठाण्याचा झैद, मुंबईची काजल अजिंक्य; राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, उर्मिला शेंडगे यांना उपविजेतेपदावर समाधान

मुंबई : घाटकोपर येथील जॉली जिमखानातर्फे आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत ठाण्याचा झैद अहमद आणि मुंबईची काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. मुंबईचा प्रशांत मोरे आणि मुंबईचीच उर्मिला शेंडगे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात झैदने विश्वविजेत्या प्रशांत मोरेवर १८-२४, २५-८, २५-० असा पिछाडीवरून तीन सेटमध्ये विजय मिळवला. झैदने या लढतीत एकूण तीन वेळा ब्रेक टू फिनिशची नोंद करून चाहत्यांची मनेही जिंकली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या अभिजीत त्रिपनकरने मुंबईच्या पंकज पवारला २५-७, २५-० अशी धूळ चारली.

महिलांच्या अंतिम लढतीत काजलने उर्मिलाचा २४-१३, २५-१३ असा सहज दोन सेटमध्येच धुव्वा उडवला. तिसऱ्या स्थानावरील खेळाडूसाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या अंबिका हरिथने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरवर २३-१५, २५-४ असे वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत एकंदर ३२ व्हाईट स्लॅम व ८ ब्लॅक स्लॅमची नोंद झाली. विजेत्यांना जॉली जिमखान्याचे सचिव मुकेश बादानी व कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक व चषक देऊन गौरवण्यात आले.

त्यापूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यांमध्ये झैदने पंकजला २५-६, १९-२०, २५-११ असे, तर प्रशांतने अभिजीतला २५-०, ०-२५, २५-६ असे नमवले होते. महिला गटात उर्मिलाने अंबिकाला २४-२३, ०-२५, २५-९ असे, तर काजलने समृद्धीला २५-२४, २२-१५ असे हरवून अंतिम फेरी गाठली होती.

logo
marathi.freepressjournal.in