स्वप्नपूर्तीचे समाधान निराळेच! सर्फराझचे वडील नौशाद खान यांची भावना

मुंबईतील आझाद मैदानापासून सुरू झालेला सर्फराझचा प्रवास आता खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने निघाला आहे.
स्वप्नपूर्तीचे समाधान निराळेच! सर्फराझचे वडील नौशाद खान यांची भावना

ऋषिकेश बामणे/मुंबई : असंख्य वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा तुमचे स्वप्न साकार होते, तेव्हा तुम्हाला जे सुख-समाधान लाभते ते निराळेच असते. त्याचा आनंद तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत. कदाचित यांमुळेच डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात, अशा शब्दांत सर्फराझ खानचे वडील नौशाद खान यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ५२ वर्षीय नौशाद हे स्वत: एकेकाळी मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळायचे. मात्र त्यांना भारतासाठी खेळण्याची संधी लाभली नाही.

मात्र त्यांचा मोठा मुलगा सर्फराझला गेल्या २-३ रणजी हंगामांत सातत्याने ७०च्या सरासरीने धावांचे शिखर रचल्यावर गुरुवारी अखेर भारतीय कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तो भारताचा ३११वा कसोटीपटू ठरला. यावेळी नौशाद तसेच सर्फराझची पत्नी स्टेडियमध्ये उपस्थित होते. माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने सर्फराझला टोपी दिली. यानंतर सर्फराझने वडिलांना आलिंगन दिले. तसेच त्याच्या वडिलांनी टोपीचे चुंबन घेतले. मुंबईतील आझाद मैदानापासून सुरू झालेला सर्फराझचा प्रवास आता खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने निघाला आहे.

“सूर्यकुमार यादवशी माझे चांगले संबंध आहेत. त्याच्या सांगण्यावरून आम्ही बुधवारीच राजकोटला येण्याचे ठरवले. सर्फराझला पदार्पणाची संधी मिळेल, याची आम्हाला खात्री होती. सकाळी सर्फराझ खेळणार हे कळताच मला अश्रू आवरणे कठीण गेले. माझेही एकेकाळी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते. मात्र सर्फराझची प्रगती पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो,” असे नौशाद म्हणाले.

“सातत्याने धावा करूनही जेव्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. तेव्हा मी त्याला संयम बाळगण्यास सांगितले. गेल्या ३-४ वर्षांचा काळ त्याच्यासाठी फारच आव्हानात्मक होता. मात्र शेवटी तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत राहिलात, तर यश एकेदिवशी मिळतेच,” असेही नौशाद यांनी नमूद केले. नौशाद (नऊ आणि सात) यांच्या नावावरूनच सर्फराझने जर्सी क्रमांक ९७ ठेवला आहे. सर्फराझचा लहान भाऊ मुशीरने नुकताच युवा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले.

वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले!

वडिलांनी माझ्यासाठी फार मेहनत घेतली आहे. त्यांच्यासमोर भारतासाठी खेळण्याचे खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने मी फार आनंदी आहे, अशा शब्दांत सर्फराझने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

“मी ६ वर्षांचा असताना क्रिकेटला सुरुवात केली. त्यांच्यासमोर एकदिवस भारतासाठी खेळावे, हेच स्वप्न होते. फलंदाजीसाठी पॅड बांधून चार तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र या संधीसाठी मी पूर्ण आयुष्य वाट पाहिली होती. त्यामुळे मला तसूभरही तणाव जाणवला नाही. माझ्या वडिलांचे भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण नाही झाले. मात्र माझ्या रूपाने ते त्यांचे स्वप्न जगत आहेत,” असे सर्फराझ म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in