सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला ४-६, ६-३, ६-४, ७-६ (३) असे नमवून विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सात विम्बल्डन विजेतेपदांपैकी त्याचे हे सलग चौथे जेतेपद ठरले. २१ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा तो मानकरी ठरला. राफेल नदालच्या २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांच्या तो आता केवळ एक पाऊल मागे आहे.
किर्गिओसने पहिला सेट ६-४ ने जिंकून आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली होती. परंतु किर्गिओसने अनेक संधी गमावल्यामुळे जोकोविचने दुसरा सेट ६-३ ने जिंकला. या सेटमध्ये जोकोविचने चार ब्रेकपॉइंट्स वाचविले. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये आघाडी-बरोबरी असे नाट्य रंगले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने ६-४ ने बाजी मारली.
एकेकाळचा नंबर वन खेळाडू जोकोविच आपल्या १९ वर्षांच्या करिअरमधील ३२ वी ग्रँडस्लॅम फायनल खेळला. तीन वेळचा चॅम्पियन जोकोविच आठव्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाला होता. कॅमरून नोरीचा पराभव करून जोकोविचने फायनलमध्ये प्रवेश केला होता. निकने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल गाठली होती. गंभीर दुखापतीमुळे नदालने उपांत्य सामन्यातून माघार घेतल्याने किर्गिओसला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता.
या दोघांमध्ये फारशा लढती झालेल्या नव्हत्या. अवघे दोन एटीपी सामन्यांमध्ये ते एकमेकांपुढे उभे ठाकले होते. हे सामने किर्गिऑसने जिंकले होते. २०१७ मध्ये आयेकापॉल्को येथे जोकोविच आणि किर्गिओस प्रथमच आमनेसामने आले होते. त्यावेळी किर्गिओसने तब्बल २५ बिनतोड सर्व्हिस करून विजय मिळविला होता. त्यानंतर इंडियान वेल्स येथे १४ बिनतोड सर्व्हिस करून किर्गिओसने जोकोविचला हैराण केले होते. त्यानंतर हे दोघे रविवारी पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले.