पान विक्रेत्याचा मुलगा करणार मुंबई खिलाडीजचे नेतृत्व

२६ वर्षीय विजयचे वडील गजानन यांची इचलकरंजीमध्ये पानपट्टी असून त्याची आई गीता जिल्हास्तरीय पातळीवर खो-खो खेळलेली आहे
पान विक्रेत्याचा मुलगा करणार मुंबई खिलाडीजचे नेतृत्व

भारताची पहिलीवहिली अल्टिमेट खो-खो लीग सुरू होण्यासाठी आता अवघे १० दिवस बाकी आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या लीगमधील मुंबई खिलाडीज या संघाचे नेतृत्व कोण करणार, याकडे खो-खोप्रेमी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागून होते. इचलकरंजीमधील पान विक्रेत्याचा मुलगा आणि राष्ट्रीय पातळीवर रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजय हजारेला हा मान मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमादरम्यान संघाचे सहमालक बादशहा आणि पुनित बालन यांच्या उपस्थितीत संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यासह कर्णधाराचे नाव जाहीर करण्यात आले.

२६ वर्षीय विजयचे वडील गजानन यांची इचलकरंजीमध्ये पानपट्टी असून त्याची आई गीता जिल्हास्तरीय पातळीवर खो-खो खेळलेली आहे. आईकडून प्रेरणा घेत गोविंदराव शाळेतून खो-खोचे बारकावे शिकल्यानंतर विजयच्या प्रगतीला सुरुवात झाली. कोल्हापूरसाठी कनिष्ठ गटानंतर त्याने खुल्या गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली. सुनील कोचेकर, अमित कागले, अमित नवाळे यांनी विजयला वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोल्हापूरसाठी चमकदार कामगिरी करतानाच रेल्वेने विजयमधील कौशल्य हेरले. गेली सात वर्षे रेल्वेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर विजय आता अल्टिमेट लीगमध्येही मुंबई खिलाडीजला विजयाची दिशा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

“कौशल्यानुसार कोल्हापूरमधील खेळाडू सर्वोत्तम असतात. रेल्वेत महाराष्ट्रासह कोल्हापूर संघातीलही बरेसचे खेळाडू आहेत. मला रेल्वेत नोकरी लागल्याने पालकांना दिलासा मिळाला असला तरी माझ्या बहिणींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज अद्याप फेडायचे आहे. त्याशिवाय लवकरात लवकर बाबांनी वाढत्या वयामुळे घरी आराम करावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे,” असे विजयने सांगितले.

फाईव्ह स्टार हॉटेल

पाहून भारावलो!

अल्टिमेट लीगच्या कॅम्पच्या निमित्ताने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली. तेथील सुविधा पाहून भारावून गेलो, अशी कबुली विजयने दिली. भविष्याच्या दृष्टीने पैसा महत्त्वाचा असल्याने ही लीग खो-खोसह खेळाडूंसाठीही मोलाची ठरणार आहे. मात्र फक्त पैशामागे न धावता संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्यालाही मी प्राधान्य देतो, असे विजयने नमूद केले.

दरम्यान, अल्टिमेट खो-खो लीगला बालेवाडी, पुणे येथे १४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून एकूण सहा संघ या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in