मियामी : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने अखेर पॅरिस सेंट-जर्मेन या क्लबला अलविदा केला आहे. मेस्सी आता उत्तर अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमधील इंटर मियामी या संघाकडून खेळताना दिसणार आहे. नामांकित खेळाडूंपैकी अमेरिकेतील फुटबॉल क्लबशी करारबद्ध झालेला मेस्सी हा पेले यांच्यानंतरचा दुसरा खेळाडू ठरला. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम इंटर मियामी संघाचा सहमालक आहे.
“अर्जेंटिनासाठी विश्वचषक जिंकल्यावर मला पुन्हा बार्सिलोनाकडे परतण्याची इच्छा होती. परंतु तसे न झाल्याने मी काहीतरी नवे करण्याच्या हेतूने अमेरिकेतील इंटर मियामी क्लबशी करार केला आहे,” असे मेस्सी म्हणाला. इंटर मियामी संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधीची चित्रफीत पोस्ट करण्यात आली आहे. मेस्सी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अल-हिलाल क्लबशी करारबद्ध होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र ३५ वर्षीय मेस्सीने अखेर इंटर मियामीकडून खेळण्याचे ठरवले. दरम्यान, मेस्सीने कोणत्या किमतीत तसेच किती वर्षांसाठी करार केला आहे, याविषयी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
२०२१मधील हंगामाच्या सुरुवातीला मेस्सी सेंट-जर्मेनकडे दाखल झाला. या संघांत मेस्सीसह नेयमार आणि किलियाम एम्बापे असे तारांकित खेळाडू असूनही त्यांना चॅम्पियन्स लीग जिंकता आली नाही. त्यापूर्वी, तब्बल १७ वर्षे मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळला होता.
माझ्या भविष्याचा निर्णय मला स्वत: घ्यायचा होता. बार्सिलोनाकडून आणखी एकदा खेळायला मला नक्कीच आवडले असते, परंतु दोन वर्षांपूर्वी जे झाले, त्याचा विचार करता मला पुन्हा ती जोखीम पत्करायची नव्हती.
- लिओनेल मेस्सी