ऑलिम्पिक आयोजनाच्या दृष्टीने उचललेले पाऊल योग्य; राष्ट्रपतींचे मत

भारताने २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी केली आहे.
ऑलिम्पिक आयोजनाच्या दृष्टीने उचललेले पाऊल योग्य; राष्ट्रपतींचे मत
Published on

नवी दिल्ली : ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले पाऊल योग्य असून, अशी स्पर्धा देशात व्हायलाच हवी. यामुळे नागरिकांना प्रेरणा मिळेलच, शिवाय देशातील क्रीडा गुणवत्तेलाही चालना मिळेल, असे मत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.

मला खेळ पाहण्यास नेहमीच आवडते. मला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही, पण जेव्हा शक्य झाले तेव्हा मी भारतीय खेळांना प्राधान्य दिले असे सांगताना राष्ट्रपती मुर्मू यांनी कबड्डी खेळाचे कौतुक केले.

भारताने २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी केली आहे. यासाठी भारताची पोलंड, मेक्सिको, इंडोनेशिया, कतार, सौदी अरेबिया या देशांशी स्पर्धा आहे. यजमानपदाचा निर्णय २०२७ मध्ये अपेक्षित आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी जून महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीतही ऑलिम्पिक यजमानपदाचा उल्लेख केला होता. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने १ रौप्यसह सहा पदकांची कमाई केली. मात्र यंदा भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही.

एशियाड, राष्ट्रकुलचे आयोजन करणार

२०३६च्या ऑलिम्पिकपूर्वी भारत देश आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळावे, यासाठीही प्रयत्न करणार आहे. जेणेकरून ऑलिम्पिकच्या दृष्टीने कशाप्रकारे तयारी करावी, याचा आढावा घेता येईल, अशी माहिती क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्याने माध्यमांना दिली.

logo
marathi.freepressjournal.in