भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा निर्णायक सामना मंगळवारी होत असून, मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने या सामन्याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
भारताने मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारत विजय मिळविला. त्यामुळे भारताचे मालिकेतील आव्हान शाबूत राहिले. आता तिसरा वन-डे सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता क्रिकेट शौकिनांना लागली आहे.
पहिला वन-डे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित षटकात ४ गडी गमावून २४९ धावा केल्या होत्या. विजयासाठी २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ८ गडी बाद २४० धावाच करू शकला.
दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने जोरदार मुसंडी मारत मालिकेत बरोबरी केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २७८ धावा केल्या.
विजयासाठीचे २७९ धावांचे आव्हान भारताने ४५.५ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात साध्य केले. मालिका जिंकण्यासाठी भारताला याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.
शेवटच्या वन-डेसाठी टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाझ अहमद यांना संधी देण्यात आली होती. दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यामध्येही दोघांना संधी मिळू शकते. कुलदीप यादवऐवजी रवी बिश्नोईला संधी मिळण्याचे संकेत आहेत.
ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. पहिल्या सामन्यातील अपयशानंतर त्याला दुसऱ्या सामन्यात संधी नाकारण्यात आली. श्रेयस अय्यरच्या जागी त्याला संधी मिळू शकते, असे सांगण्यात येते. सलग दोन सामन्यांतील दमदार कामगिरीनंतर श्रेयसला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अावेश खान, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, वाशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रजत पाटीदार, शाहबाझ अहमद, राहुल त्रिपाठी.
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कर्णधार), जेनमन मलान, क्विंटन डिकॉक, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, रिझा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, एनरिक नॉर्टजे, एंडिले फेहलुकवायो.
n सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून
n ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, िदल्ली
n थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क