
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली. तसेच या स्पर्धेत दोन संघांचे हक्क मिळवण्यासाठी इच्छुक आणि पात्र पक्षांकडून निविदा मागवण्यासाठी निविदा दस्तावेज प्रसिद्ध केला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २७ मेपासून स्पर्धेला सुरुवात होईल.
२०१८ मध्ये प्रथमच खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेचे २०१९मध्ये दुसरे पर्व झाले. मात्र त्यानंतर कोरोनामुळे ही लीग बंद पडली. आता तब्बल ६ वर्षांनी ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येईल. या लीगमधून पुढे आलेल्या यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांसारख्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उच्चस्तरावर खेळण्याची संधी मिळवली आहे. पहिल्या दोन हंगामांप्रमाणे यावेळीही ८ संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
यामध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स, आर्क्स अंधेरी, ट्रिम्प नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, नमो बांद्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स हे आधीचे सहा संघ आहेत. मात्र शिवाजी पार्क लायन्स व सोबो सुपरसोनिक्स या दोन संघांचे मालक बदलणार आहेत. तसेच त्या संघांची नावेही बदलली जाऊ शकतात. त्यामुळेच एमसीएने नव्या भागधारकांना या लीगचा भाग होण्याची संधी दिली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एमसीएच्या कार्यालयात ७ एप्रिलपर्यंत संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच खेळाडूंनी एमसीएच्या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करायची आहे. स्पर्धेत १६ वर्षांवरील एमसीएशी संलग्नित खेळाडूंनाच प्रवेश देण्यात येईल. तसेच नाव नोंदणीसाठी १० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
“टी-२० मुंबई लीगने स्थानिक पातळीवरील क्रिकेटपटूंची निवड करणे, त्यांना घडवणे आणि प्रोत्साहन देणे यात मोलाची भूमिका बजावली आहे. लीगने उदयोन्मुख खेळाडूंना एक व्यासपीठ प्रदान करण्याबरोबरच मुंबईतील क्रिकेटच्या विकासात लक्षणीय योगदान दिले आहे. आम्ही नवीन फ्रँचायझी मालकांचे स्वागत करत असताना याकडे या लीगच्या परंपरेला आणखी बळकट करण्याची संधी म्हणून पाहतो. नवा दृष्टिकोन, नवीन गुंतवणूक घेऊन येणारा त्यांचा सहभाग टी-२० मुंबई लीगच्या पुढील टप्प्याचे स्वरूप निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल,” असे एमसीएचे सचिव अभय हडप यांनी सांगितले.